ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाई करण्यात येत असून अशाचप्रकारच्या कारवाईसाठी मुंब्रा-कौसा भागात गुरुवारी गेलेल्या पालिकेच्या पथकाचा रस्ता रहिवाशांनी रोखून धरला. पथकाकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होते. मात्र, रहिवाशी रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हते. यामुळे सायंकाळी पालिकेच्या पथकाने राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करून कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. यापैकी काही बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवरून पालिकेची कानउघडणी करत ही बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना शीळ फाटा भागात जाऊन २१ अनधिकृत इमारतींवर कारवाई करावी लागली होती.
या कारवाईनंतर न्यायलयाकडून जसजसे आदेश प्राप्त होत आहेत, त्याप्रमाणे पालिकेची पथके संबधित इमारती रिकाम्या करून कारवाई करत आहे. अशाचप्रकारे मुंब्रा-कौसा येथील भोलेनाथ नगर मधील आनम पॅलेस इमारतीवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकाला रहिवाशांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. मुंब्रा-कौसा येथील भोलेनाथ नगर मधील आनम पॅलेस इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक गुरूवारी सकाळी पोलिस पथकासह मोठा फौजफाटा घेऊन गेले होते.
ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाई करण्यात येत असून अशाचप्रकारच्या कारवाईसाठी मुंब्रा-कौसा भागात गुरुवारी गेलेल्या पालिकेच्या पथकाचा रस्ता रहिवाशांनी रोखून धरला. पथकाकडून समजूत… pic.twitter.com/T6xO3F2QZK
— LoksattaLive (@LoksattaLive) September 11, 2025
या इमारतीत ४० कुटूंबे राहतात. हि इमारत दाटीवाटीच्या वस्तीत असल्यामुळे तिथे वाहनेही नेणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेची पथके इमारतीवर कारवाई करण्यासाठी जात होती. याच दरम्यान, इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहिवाशांनी ठिय्या मांडत पथकाचा रस्ता अडविला होता. यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करत असल्याचे पालिकेच्या पथकाकडून सांगण्यात येत होते आणि रस्त्यावरून बाजूला होण्यासाठी त्यांची समजूत काढत होते. परंतु रहिवाशी रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हते.
जेव्हा या इमारतींचे बांधकाम चालू होते, तेव्हा मनपा अधिकारी डोळा मिटून होते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत होता. तसेच आम्हाला पर्यायी घर द्या आणि त्यानंतरच कारवाई करा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत होती. सायंकाळपर्यंत हेच चित्र होते. अखेर सायंकाळी पालिकेच्या पथकाने राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करून कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.