डोंबिवली : रेल्वेतून सेवानिवृत्त झालेल्या डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचावाडा भागातील एका नोकरदाराने अनेक वर्ष चाळीत राहिलो. आता सेवानिवृत्तीची शेवटची पुंजी मिळाली आहे. ती घर खरेदीत गुंतवून लहानशी सदनिका आपण कुटुंबियांसाठी घेऊ असा विचार केला. या कुटुंबीयांना एका विकासकाने स्वप्नातील घर देण्याचे आश्वासन दहा वर्षापूर्वी दिले. या कुटुंबियांकडून विकासकाने टप्प्याने सदनिकेसाठी २३ लाख रूपये उकळले. त्यानंतर मागील दहा वर्षात घर नाहीच, घराचे घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विकासका विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा अजित म्हात्रे चाळ भागात राहणाऱ्या मीना निरभवणे यांंनी डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमध्ये राहणारे विकासक प्रसाद जनार्दन पाटोळे यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. जुलै २०१६ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा घर खरेदीतील फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

मीना निरभवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे, पती २०१६ मध्ये रेल्वेतून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीमधून मिळणाऱ्या एक रकमी रकमेतून एक बीएचके सदनिका घेण्याचे ठरले. घरा शेजारी पुनर्विकासातील एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. हे बांधकाम विकासक प्रसाद पोटोळे करत होते. पाटोळे यांच्याशी पती काबू निरभवणे यांनी संंपर्क साधला. त्यांनी २२ लाखात आपल्या हिश्यातील सदनिका देण्याचे कबूल केले. काम होईल त्याप्रमाणे पैसे देण्याची सूचना केली.

मनासारखे घर मिळते म्हणून टप्प्याने एकूण १८ लाख रूपये निरभवणे यांनी विकासक पाटोळे यांना दिले. करोना महासाथीत या इमारतीला बांधकाम परवानगी नाही म्हणून पालिकेने कारवाई कली. ही कारवाई रोखण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आहेत म्हणून पाटोळे यांनी आपल्याकडून दोन लाख रूपये घेतले, असे तक्रारीत आहे. मालक, विकासक वादात आम्ही घराचे पैसे परत मागू लागलो.

पोटोळे यांनी सुनीलनगरमध्ये माझे भागीदार सुनील भगत, अजित म्हात्रेंसोबत श्री सदगुरू छाया नावाने बांधकाम सुरू आहे. तेथे तुम्हाला सदनिका देतो. दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिकेची दस्त नोंदणी करण्यात आली. काही दिवसांनी पालिकेने ते बांधकाम तोडून टाकले. आम्ही सदनिकेचे पैसे पाटोळे यांच्याकडे मागू लागले. ते बाजुलाच एकदंत हाईट्समध्ये तुम्हाला सदनिका देतो. तेथे तीन माळ्याचे बांधकाम होते. पुढील बांधकामाला कडोंमपा परवानगी देत नाही असे सांगण्यात आले. पाटोळे आम्हाला दररोज सदनिका देतो असे आश्वासन देत होते. सन २०२३ पर्यंत घेतलेली रक्कम आणि सदनिका दिली नसल्याने आपण विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी विकासक प्रसाद पोटोळे यांना बोलविले. त्यांंनी पैसे घेतल्याची कबुली दिली. पैसे परत करण्यासाठी धनादेश दिले. ते बँकेत वटले नाहीत. आपण साई, सद्गुरू, अंबर डेव्हलपर्सचे भागीदार आहोत, असे पाटोळे निरभवणे कुटुंबीयांना सांगत होते.