‘आईसक्रिम खायचे असेल तर दुकानदाराला पहिले पैसे दे, मग आईसक्रिम घे’ असे एका रिक्षा चालकाने दुकानात आलेल्या दोन तरुणांना सांगितले. त्याचा राग येऊन दोन तरुणांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील बालाजी गार्डन गृहसंकुला जवळील एका दुकानात घडली आहे.

शब्रीश अय्यर (२९, रा. रिध्दीसिध्दी चाळ, समतानगर, आयरे, डोंबिवली पूर्व) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. आकाश बडवा, ओमकार अशी आरोपींची नावे आहेत. बालाजी गार्डन जवळील डीएसपी इंपिरिअल इमारतीत रितेश स्नॅक्स स्टोअर्स मध्ये हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले, रिक्षा चालक शब्रीश अय्यर हे समतानगर मध्ये राहतात. ते रिक्षा चालक आहेत. घरी जाण्यापूर्वी ते रितेश स्नॅक्स दुकानात दुध खरेदीसाठी आले होते. दुध खरेदी करत असताना तेथे आकाश बडवा, त्याचा मित्र अनमोल आले. त्यांनी दुकानदाराकडे आईसक्रिम उधारीने मागितले. दुकानदाराने पहिले पैसे द्या मग आईसक्रिम देतो असे सांगितले. त्यावेळी तेथे हजर असलेल्या शब्रीश अय्यर यांनी दुकानदाराची बाजू घेऊन ‘तुम्ही पैसे देऊन आईसक्रिम खरेदी करा,’ असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा चालकाच्या या बोलण्याचा तरुणांना राग आला. त्यांनी चालक अय्यरला ‘दुकानदार आम्हाला काही बोलत नाही. मग तुच आम्हाला बोलतोस’ असे म्हणत रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. ओमकारने रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर दुखापत केली. अचानक घडलेल्या या घटनेने दुकानदार घाबरला. काही कारण नसताना तरुणांनी मारहाण केल्याने रिक्षा चालक अय्यर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तरुणां विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.