• १०० कोटी रस्ते रुंदीकरणासाठी
  • १०० कोटी विकास आराखडय़ातील रस्त्यांसाठी
  • ६० कोटी जोड रस्त्यांसाठी

ठाणे महापालिका क्षेत्रात ३५६ कि.मी लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी २४६ कि.मी लांबीचे रस्ते डांबरी तर उर्वरित ११० किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. शहरातील वाहतूकीच्या दृष्टीकोनातून हे रस्ते अपुरे पडू लागले असून यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर शहराला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्यावर्षीपासून ठोस पाऊले उचलली आहेत. गेल्यावर्षी ५२.४२१ किमी लांबीचे १०९ रस्ते प्रस्तावित करण्यात आले असून या सर्व रस्त्यांची कामे वर्षभरात पुर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. शहरातील पोखरण रस्ता क्रमांक १ व २, शास्त्रीनगर ते हत्तीपुल, सुभाष पथ, खोपट रस्ता, मुंब्रा स्थानक ते वाय जंक्शन या रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू असून या रुंदीकरणासाठी ७६.५० हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रातील १४.४४ किमी लांबीच्या १३ रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी ४.७५ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत तसेच विकास आराखडय़ातील १७.६० किमी लांबीचे १९ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी ४.०५ किमी लांबीच्या रस्त्यांचे काम पुर्ण झाले आहे. या दोन्ही योजनेतील उर्वरित रस्त्यांची कामे मार्च २०१८ पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी २.२३ किमी लांबीचे दोन जोडरस्त्यांची कामे सुरू असून ही कामे मार्च २०१८ पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे.

अवजड वाहतुकीला बावळण

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोस्टल रस्ता तयार करण्यात येणार आहे. गायमुख ते भिवंडी बाह्य़वळण मार्गापर्यंत हा रस्ता असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हा रस्ता विकसित करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेने आठ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. घोडबंदर मार्गामुळे शहरामध्येही वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबईहून येणारी वाहतूक श्रीनगर, पातलीपाडा, गायमुख मार्गे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वळविण्यासाठी फुट हिल रस्ता विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात गायमुख ते पातलीपाडा रस्ता विकसित करण्यात येणार असून या प्रकल्पाचा खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व महापालिका निधीतून करण्यात येणार आहे. या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये १० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. ठाणे शहरातील वाहतूक कळवा नाका ते रेतीबंदरकडे वळविण्यासाठी ३.९५ किमी लांबीचा व ३० मीटर रुंदीचा कळवा ते पारसिक लिंक रोड बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील अवजड वाहतूक शहराबाहेरून जाऊ शकेल. या कामासाठी दोन कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

नवीन रस्त्यांचे जाळे आणि पैशांची बचत

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने रस्ते विकास योजना आखली आहे. या योजनेंतर्गत विकास आराखडय़ातील रस्ते विकसित करण्यासाठी पाच वर्षांकरिता लक्ष्य आखले आहे. त्यामध्ये गायमुख ते दिव्यापर्यंत ८६.५४ किमी लांबीचे ८१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे.  त्यासाठी २५४.५६ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. या सर्व रस्त्यांची कामे विकास हस्तांतरण हक्कच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी विकास हस्तांतरण हक्कच्या माध्यमातून ३.३० किमी लांबीच्या पाच नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्यामुळे महापालिकेच्या ७८.४७ कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्याचप्रमाणे यंदा ४.६४ किमी लांबीचे सात नवीन रस्ते विकसित करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. या योजनेमुळे महापालिकेचे ११३ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

विकास योजना अंमलबजावणीचा दर वाढला

विकास योजना अंमलबजावणीचा दर यापूर्वी २६.६८ टक्के होता. रस्ता रुंदीकरणाच्या कामांमुळे विकास योजना अंमलबजावणीचा दर ५६.९५ टक्के इतका झाला आहे. येत्या पाच वर्षांत हा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी दरवर्षी दहा टक्के विकास योजनेची अंमलबजावणी करण्याचा प्रशासनाने निर्धार केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road development in tmc budget
First published on: 31-03-2017 at 01:18 IST