कल्याण- कल्याण मधील बाहेरील वाहनांचा शहरांतर्गत भार कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कल्याण शहराबाहेरील पत्रीपूल ते दुर्गाडी पूल दरम्यानच्या गोविंदवाडी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अगोदरच या रस्त्यावर तेबेल मालकांनी २२ बेढब गतिरोधक याठिकाणी बांधून ठेवले आहेत. त्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालक आपला त्रास वाचविण्यासाठी शिवाजी चौकातून येजा करत आहेत.
कल्याण शिळफाटा, भिवंडी मार्गे येणारी वाहने दुर्गाडी किल्ला येथून गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याने पत्रीपूल मार्गे इच्छित स्थळी जातात. शिळफाटा मार्गाने येणारी वाहने कल्याण शहरात शिवाजी चौक मार्गे न जाता ती पत्रीपूल गोविंदवाडी रस्ता, दुर्गाडी रस्त्याने इच्छित स्थळी जातात. १५ वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महांमंडळाला भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी कल्याण डोंबिवली पालिकेची ना हरकत पाहिजे होती.
हेही वाचा : ठाणे पालिका म्हणतेय शहरात १३८ खड्डे; यंदा गणेश मूर्तीचे आगमन खड्ड्यातून होणार?
या ना हरकतीच्या बदल्यात कल्याण डोंबिवली पालिकेने एमएसआरडीसीकडून गोविंदवाडी रस्त्याची बांधणी करुन घेतली. या ६० फुटी रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही कल्याण डोंबिवली पालिकेची जबाबदारी आहे. या रस्त्यावरील खड्डे, बंद असलेल्या पथदिव्यांकडे पालिकेचा बांधकाम, विद्युत विभाग लक्ष देत नसल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. डोंबिवली हद्दीतील खड्डे भरणीची कामे वेगाने सुरू असताना कल्याण हद्दीत ही कामे सुरू का करण्यात आली नाहीत, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. गोविंदवाडी रस्त्यावरुन पायी जात असताना वाहनांमुळे खड्डयांमधील पाणी अंगावर उडते. शाळेतील मुले या खड्डयांमधून प्रवास करतात.
शिवाजी चौकातून प्रवास
गोविंदवाडी रस्त्यावर खड्डे असल्याने शिळफाटा, भिवंडी, पडघा दिशेने येणारे वाहन चालक खड्डे चुकविण्यासाठी लालचौकी, सहजानंद चौक, शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जातात. शहरांतर्गत वाहतुकीवर भार गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. शहर अभियंता विभागाचा कारभार ढेपाळला असल्याने त्याचे चटके नागरिकांना खड्ड्यांच्या माध्यमातून बसत आहेत.
एमएसआरडीसीचे पालिकेला पत्र
मार्च २०२१ मध्ये ‘एमएसआरडीसी’ने कडोंमपाला पत्र लिहून गोविंदवाडी रस्ता ताब्यात घेण्या संदर्भात कळविले होते. कडोंमपाच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी ७ मे २०२१ रोजी ‘एमएसआरडीसी’चे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांना कळविले की महामंडळाने या रस्त्यावरील स्थापत्य, विद्युत कामे पूर्ण केल्यानंतर हा रस्ता पालिकेकडून ताब्यात घेतला जाईल. एमएसआरडीसीने गोविंदवाडी रस्त्याचे डांबरीकरण, मध्य रस्ता दुभाजक सौंदयीकरण, पथदिवे, त्यांची नियंत्रण पट्टी सुस्थितीत बसवून नोव्हेंबर २०२१ पर्यंत वीज देयक एमएसआरडीसीने भरणा केले आहे, असे पालिका शहर अभियंता विभागाला कळविले.
गोविंदवाडी रस्त्याची सर्व कामे पूर्ण झाल्याने हा रस्ता यापूर्वीच्या कराराप्रमाणे पालिकेने देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात घ्यावा. १ डिसेंबर २०२१ पासून या रस्त्याची देखभाल पालिकेने करावी, असे हस्तांतर पत्र एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता सोनटक्के यांनी शहर अभियंता सपना कोळी यांना पाठविले आहे. तरी पालिकेकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेजात आहे. गोविंदवाडी रस्त्यावरील पथदिवे का बंद आहेत या विषयी माहिती घेऊन सांगतो असे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सांगितले. परंतु, पुन्हा त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही.
पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पालिकेने आता प्राधान्याने खड्डे भरणीची कामे सुरू करुन गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करावेत. अन्यथा शिवसेना पध्दतीेने खड्डे कसे भरायचे हे अधिकाऱ्यांना दाखविले जाईल.
सचिन बासरे, शहर अध्यक्ष शिवसेना, कल्याण
कल्याण शहरातील खड्डे भरणीची कामे दोन दिवसात रेडीमिक्स पध्दतीने भरण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. पावसामुळे ही कामे हाती घेतील नाहीत. गणेशोत्सापूर्वी गोविंदवाडीसह कल्याण मधील खड्डे भरणीची कामे पूर्ण केली जातील.
जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता कल्याण