scorecardresearch

शीळ रस्त्यावरील कोंडी करणारे छेद रस्ते वाहतूक विभागाकडून बंद, ग्रामस्थांमध्ये नाराजी

अनावश्यक असलेले छेद रस्ते बंद, दुभाजकांमधील गाळे बंद करण्याचे आदेश वाहतूक अधिकाऱ्यांना दिले

traffic jam sheel phata
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील २७ गाव हद्दीत गेलेल्या काही पोहच रस्त्यांमुळे मुख्य रस्त्यावर वाहन कोंडी होत असल्याने अशाप्रकारचे रस्ते वाहतूक विभागाने सिमेंटचे अडथळे उभे करुन बंद कण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पर्यायी निमुळत्या रस्त्यांवरुन वाहने वळविण्यास सांगून वाहतूक विभाग गाव हद्दीत नव्याने वाहतूक कोंडीस हातभार लावत आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

शीळ रस्त्यावरील वाढती वाहन कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली होती. शीळ रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर पत्रीपूल ते लोढा जंक्शन दरम्यान गावात जाणारे, नवीन गृहसंकुलात जाणारे एकूण ५२ छेद रस्ते आहेत. या रस्त्यांव्यतिरिक्त शीळ रस्त्यावर ढाबे, हॉटेल, पेट्रोलपंप मालकांनी सोयीसाठी रस्ता दुभाजक लावून देण्यास ठेकेदाराला विरोध केला. या भागातून वाहन चालक जागीच वळण घेत असल्याने दोन्ही बाजुंनी धावणाऱ्या वाहनांना अडथळा येतो. असे प्रकार शीळ रस्त्यावर नियमित होतात. असे बैठकीत वाहतूक अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले होते.

आणखी वाचा- ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी, सुमारे चार किलोमीटर रांगा

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५२ मुख्य छेद रस्त्यांव्यतिरिक्त अनावश्यक असलेले छेद रस्ते बंद, दुभाजकांमधील गाळे बंद करण्याचे आदेश वाहतूक अधिकाऱ्यांना दिले होते. वाहतूक उपायुक्तांच्या आदेशावरुन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे गाळे, रस्ते बंद करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले होते. ठेकेदाराने ही कामे पूर्ण न केल्याने वाहतूक विभागाला ही कामे हाती घ्यावी लागली आहेत.

ग्रामस्थांची तक्रार

कल्याण-शीळ रस्त्याला गाव हद्दीतून येणारे पोहच रस्ते सरसकट बंद केले तर गाव हद्दीतील अरुंद रस्त्यावरुन वळसा घेऊन ग्रामस्थांना शीळ रस्त्याला यावे लागेल. गाव हद्दीतील बहुतांशी रस्ते निमुळते अरुंद आहेत. या रस्त्यांवरुन एकाचवेळी अवजड, लहान, मोठी वाहने आले तरी गावांतर्गत कोंडी होणार आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका शालेय बस, रुग्णवाहिका यांना बसणार आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी गाव हद्दीत वाहतूक पोलीस नसेल तर तासनतास नव्या कोंडीत वाहन चालकांना अडकावे लागणार आहे, अशी माहिती काटईचे ग्रामस्थ नरेश पाटील यांनी दिली.

आणखी वाचा-कल्याण पूर्वमध्ये जीन्स कारखान्यांची २२ गोदामे भुईसपाट

हाॅटेल, ढाबे, पेट्रोल पंप मालकांनी आपल्या सोयीप्रमाणे काही ठिकाणी ठेकेदाराला रस्ता दुभाजकांमध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे. त्याठिकाणी होणाऱ्या कोंडीमुळे गाव हद्दीतून येणारे मुख्य वर्दळीचे सरसकट सर्वच रस्ते बंद करण्यास वाहतूक विभागाने सुरूवात केली तर नव्या कोंडीला या भागात ग्रामस्थांसह बाहेरील वाहन चालकांना तोंड द्यावे लागणार आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. व्यावसायिक ठिकाणचे गाळे बंद करावेत. तो नियम गाव हद्दीतील जुन्या रस्त्यांना वाहतूक विभागाने लावू नये, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. शीळ रस्त्याला लागण्यासाठी जे अंतर दोन मिनिटात यापूर्वी पार करता येत होते, त्यासाठी १० मिनिटाचा फेरा घ्यावा लागत असेल तर कोंडीचा नवा अवतारा या भागात तयार होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

“शीळ रस्त्याकडे गाव हद्दीतून येणारे जुने छेद रस्ते वाहन कोंडीत भर घालतात. काही ठिकाणी व्यावसायिकांनी दुभाजक काढले आहेत. असेच रस्ते बंद केले जात आहेत. सरसकट सर्वच रस्ते बंद केले जात नाहीत.”- रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी, वाहतूक विभाग.

“गाव हद्दीतून शीळ रस्त्याकडे येणारे जुने रस्ते वाहतूक विभागाने बंद करू नयेत. हे पारंपारिक रस्ते बंद केले तर नवीन कोंडीला गाव हद्दीत सुरुवात होईल.”- नरेश पाटील, ग्रामस्थ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:15 IST

संबंधित बातम्या