डोंबिवली पश्चिमेतील शिवाजीनगर भागात पालिकेच्या विकास आराखडय़ात सुमारे ४५ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याचे काम एका स्थानिक भूमिपुत्राने हरकत घेतल्याने दोन वर्षांपासून रखडले आहे. हरकत घेणाऱ्या ग्रामस्थाचा या आराखडय़ातील रस्त्याशी कोणताही संबंध नसताना कामात खोडा घालण्यात आल्याची चर्चा आहे. 

महापालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विकास आराखडय़ातील रस्ते चाळी, अतिक्रमणे, इमारती यांनी बाधित होत आहेत. स्थानिक माफिया या रस्त्यांवर बेमालूमपणे चाळी उभारत असल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली महत्त्वाची आरक्षणे गिळली जात आहेत. टिटवाळा, कल्याण, डोंबिवली परिसरात हे प्रकार नित्याचे होऊ लागले आहेत. मौज शिवाजीनगर भागात एका खासगी जमीन मालकाचे २ हजार १८० चौरस मीटर क्षेत्र ४५ मीटर रस्त्यासाठी विकास आराखडय़ासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या जमिनीचे मूळ वारस सुमन म्हात्रे आणि त्यांच्या अन्य वारसदारांनी सव्‍‌र्हे क्र. ७२, हि. नं. ८ व ९ या भूखंडावरील ४५ मीटर रस्त्याचे क्षेत्र सप्टेंबर २०१२ मध्ये पालिकेला ताबा पावतीने बहाल केले. रस्त्याच्या या आरक्षित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सप्टेंबर २०१४ मध्ये ठाकुर्ली येथील तलाठय़ाने महापालिकेची नावनोंदणी केली आहे.
रस्त्याखालील आरक्षित क्षेत्र ताब्यात घेताना पालिकेने विकासक व जमीन मालकाला या रस्त्याचे खडीकरण करून देण्याचे कळवले होते. यावरून नगररचना विभाग, विकासक यांच्यात पत्रव्यवहार सुरू होता. जमीन नावावर झाल्याने महापालिकेने या रस्त्याचे काम करण्याचे निश्चित केले होते. रस्ता रुंदीकरण, गटार कामांच्या आड येणारी सहा झाडे, एक बेकायदा स्वच्छतागृह महापालिका अधिकाऱ्यांनी दीड वर्षांपूर्वी पाडले. रस्त्याचे काम प्रगतिपथावर दिसू लागताच या भागातील रहिवासी बाळू वाळकू भोईर यांनी त्यांचा या आरक्षित जमिनीशी कोणताही संबंध नसताना हरकत घेतली आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. हा रस्ता पूर्ण झाला तर कुंभारखाणपाडा खाडी किनाऱ्यापासून बाह्य़ वळण रस्त्याला पोहोचणे शक्य होणार आहे. अधिक माहितीसाठी पालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्याशी सतत संपर्क करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

रस्त्यांवर बेकायदा बांधकामे
डोंबिवली पश्चिमेतून कोपर, मोठागाव, महाराष्ट्रनगर, कुंभारखाणपाडा भागातून महापालिकेचा प्रस्तावित बाह्य़ वळण रस्ता आहे. या रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीवर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. कोपर ते टिटवाळ्यापर्यंत १९ किलोमीटर लांबीच्या या बाह्य़ वळण रस्त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा खर्च येणार होता. निधीच्या अभावी हा प्रकल्प रखडला. त्यानंतर एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवण्याचे व हा रस्ता प्रकल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. या बाह्य़ वळण रस्त्या खालील मोठागाव, रेतीबंदर, गरिबाचापाडा, कुंभारखाणपाडा भागातील जमीन भूमाफियांनी चाळी बांधून हडप केली आहे.