भारतात दहा ऋतूंचे दहा सोहळे असतात आणि त्या ऋतूप्रमाणे पदार्थ उपलब्ध असतात. त्यामुळे ऋतुकालानुसार वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी खवय्ये नेहमीच उत्सुक असतात. आता पाऊस माघारी फिरला आहे. ऑक्टोबर हीटमुळे उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने खवय्यांची पावले पुन्हा आइस्क्रीम पार्लर आणि ज्यूस सेंटरकडे वळू लागली आहेत. कढईतून आपल्यासमोर काढलेला गरमागरम पदार्थ खायला खूप धमाल येते. मात्र थंड पदार्थाबाबत तसा आनंद घेता येत नाही. शीतपेटीतून काढलेले आइस्क्रीम आपल्याला दिले जाते. मात्र उकळत्या तेलातून खरपूस तळलेली भजी जशी वर येताना दिसते तसे आइस्क्रीम गोठताना दिसले तर डोंबिवलीतील रोल अॅण्ड स्वर्ल या आइस्क्रीमच्या दुकानात आपल्याला आइस्क्रीमचे हे गोठणे अनुभवता येते.
आइस्क्रीम हा घरातील लहानथोर सर्वाचा आवडता पदार्थ आहे. कितीही पोटभर जेवण झाले तरी गारेगार आइस्क्रीम खाल्ल्याशिवाय पार्टी संपल्यासारखी वाटत नाही. आइस्क्रीम या पदार्थाची ही सर्वव्यापक लोकप्रियता लक्षात घेऊन डोंबिवलीतील चिन्मय सरदेशमुख, अरुण अय्यर, तेजस चितोडकर, पुरुषोत्तम भट हे चार तरुण लाइव्ह आइस्क्रीम ही संकल्पना घेऊन आले आहेत. एक लिटरच्या एका बाटलीमध्ये दूध, आइस्क्रीम पावडर आणि साखर आदी जिन्नस एकत्र करून ठेवले जातात. त्यामुळे आइस्क्रीम बनविण्यास सोपे जात असल्याचे चिन्मय याने सांगितले. लाइव्ह आइस्क्रीम बनविण्यासाठी लागणारी यंत्रणा थायलंड येथून मागविली असल्याचेही त्यांनी सांगितले. एक लिटर दुधात वीस आइस्क्रीम तयार होतात. त्यानंतर हे सर्व मिश्रण एका यंत्रावरील पसरट भांडय़ात टाकले जाते. त्यात हव्या त्या ताज्या फळांचा गर मिसळला जातो. मुले फळे खायला कंटाळा करतात. त्यामुळे आइस्क्रीमच्या माध्यमातून त्यांना फळे देता येतात. फळांचे बारीक तुकडे करून आइस्क्रीमच्या मिश्रणात टाकले जातात. त्यानंतर आइस्क्रीमचा गोळा तयार होतो. त्यानंतर ते आइस्क्रीम भांडय़ात पसरले जाते. मग त्याचा रोल केला जातो. हा रोल करणे अतिशय कठीण काम असल्याचे अरुण अय्यर याने सांगितले. कारण आइस्क्रीम प्रमाणापेक्षा अधिक घट्ट झाले तर त्याचा रोल करणे कठीण जाते आणि त्याचे तुकडे पडतात. चॉकलेट आइस्क्रीम बनविल्यानंतर त्यावर चोकोपाय तसेच ओरिओ बिस्किटसारखे पदार्थ वापरून साजवट केली जाते. कुठलेही ड्रायफ्रुट आइस्क्रीम बनविताना त्यामध्ये ड्रायफ्रुटस्चे तुकडे टाकले जातात. त्यामुळे ज्या लहान मुलांना ड्रायफ्रुट खायला आवडत नाही. त्यांच्या पोटात आइस्क्रीमच्या माध्यमातून ड्रायफ्रुट्स पोटात जाते. रोज आइस्क्रीम तयार झाल्यानंतर ते रोल केले जाते तेव्हा खरोखरच काश्मिरी गुलाब खात असल्यासारखाच फील खवय्यांना येतो. एका कपात आइस्क्रीमचे तीन रोल दिले जातात. तसेच आइस्क्रीम बनवून पूर्ण झाल्यानंतर त्यावरही ज्या फ्लेवरचं आइस्क्रीम मागवतो, त्याच फ्लेवरची ताजी फळे ठेवून सजावट केली जाते. त्यामुळे एक आइस्क्रीम घेतले तरी तिघे जण आरामात बसून ते खाऊ शकतात. मात्र हे आइस्क्रीम खाण्यासाठी जरा वेळ काढूनच यावे लागते. कारण अत्यंत नाजूक हाताने रोल करावा लागत असल्याने ते ऑर्डर केल्यानंतर दहा मिनिटांनी खायला मिळते. मात्र आपल्यासमोर आइस्क्रीम तयार होताना पाहण्यात मौज आहे. दुकान जरी मोठे नसले तरी ते अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवले आहे. मुंबई आणि विशेष म्हणजे तरुणांची भाषा एका भिंतीवर लिहिलेली आहे. दुसऱ्या भिंतीवर विविध आकर्षक चित्रे काढली आहेत. तरुणांना रोस्टेड अलमंड, राजभोग, पानमसाला, चोको अलमंड, गुलकंद, रेड वेल्वेट, कॉफी वॉलनट, ब्लॅक फोरेस्ट, रॉकी रोड आदी आइस्क्रीम तरुण खवय्यांना अधिक आवडतात तर सिताफळ, लिची, सफरचंद, चिकू आदी आइस्क्रीम ज्येष्ठ नागरिक खाणे पसंत करत असल्याचे तेजस याने सांगितले. किमान ५० ते जास्तीतजास्त शंभर रुपयांना हे आइस्क्रीम मिळते.
रोल अॅण्ड स्वर्ल
कुठे- दुकान क्र. ३, डेढिया निवास, चेड्डा रोड, डोंबिवली (पू.)