ठाणे – ग्रामीण भागाच्या आरोग्यसेवेची धुरा सांभाळणारी व्यवस्था म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र ओळखली जातात. मात्र ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसमवेतच चक्क शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला देखील पावसामुळे गळती लागल्याचे उघड झाले आहे. यामुळे आधीच अपुऱ्या आरोग्य सोयींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना आता गळक्या छताखाली उपचार घ्यावे लागत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारणीचे काम करण्यात येत आहे. वाहतूक, आरोग्य, शिक्षण यांसह अनेक कोट्यवधी रुपयांची कामे सूर आहेत. मात्र असे असतानाचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडे आणि विशेषतः आरोग्य व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. ठाणे जिल्ह्याचा मोठा ग्रामीण भाग म्हणून शहापूर आणि मुरबाड हे दोन तालुके ओळखले जातात. या ग्रामीण भागाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये विविध त्रुटी असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.
काही महिन्यांपूर्वीच शहापूर तालुक्यात सुरु करण्यात आलेले डायलिसिस केंद्रात अपुरी व्यवस्था असल्याने आणि डॉक्टरांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी केंद्रांतून उपचार घ्यावे लागत असल्याचे उघड झाले होते. याच पद्धतीने आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला गळती लागल्याने रुग्णांना तशाच स्थितीत नाईलाजाने उपचार घ्यावे लागत आहे.
ताडपत्रीने गळती थांबणार ?
अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील पाण्यापासून वाचण्यासाठी पत्र्याचा शेड बांधण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे हे पत्रे उडून गेले. यानंतर अद्याप या ठिकाणी पत्रे लावण्यात आले नाही. यामुळे आधीच जीर्ण झालेल्या इमारतीच्या छतातून पाणी झिरपत आता थेट रुग्णांच्या खाटेवर पडत आहे. यामुळे काही रुग्णांना हिरकणी कक्षात उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ही गळती रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात संपूर्ण केंद्राच्या छतावर जाड ताडपत्री टाकण्यात आली असून गळतीचे प्रमाण काही अंशी थांबले असल्याची प्रतिक्रिया अघई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रमेश जाधव यांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयाला ही गळती
शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पुरुष रुग्णांच्या कक्षात ही पावसामुळे गळती होत आहे. तर छतावर सर्वत्र ओलावा पसरला आहे. यामुळे प्लास्टर कमकुवत होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक वयोवृद्ध रुग्ण देखील या ठिकाणी उपचार घेत असून संपूर्ण जमिनिवर पाणी असल्याने पाय घसरुन पडल्याने दुखापत होण्याची शक्यता आहे.