ठाणे : मखमली तलाव येथील जोंधळी बाग भागात बुधवारी ५० वर्ष जुन्या एकमजली बंगल्याच्या सज्जाचा भाग कोसळला. या घटनेत एका वाहनाचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर बंगल्यामध्ये राहणाऱ्या तीन व्यक्तींना बंगला रिकामा करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेने दिल्या.जोंधळी बाग भागात एकमजली बंगला आहे. बुधवारी दुपारी बंगल्याच्या सज्जाचा भाग अचानक एका मोटारीवर कोसळला. तसेच बंगल्याचा उर्वरित भाग देखील अत्यंत धोकादायक झाला होता.

घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे, उप-अभियंते, कनिष्ठ अभियंते, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.बंगल्यामध्ये राहणाऱ्या तीन व्यक्तींना बंगला रिकामा करण्याच्या आणि बंगला मालकाला बंगला दुरुस्त करण्याच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्या. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाने बंगल्याच्या आवारात धोकापट्टी बांधली.