ठाणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली परिसरात ग्राहकपेठा फुलू लागल्या आहेत. शोभेच्या वस्तूंपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत सर्वच प्रकारचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या ग्राहकपेठांमध्ये गेल्या एक-दोन वर्षांत ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांची लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या महिला स्वावलंबनाकडे वाटचाल करत असून त्यांना रोजगाराची नवी संधी मिळत असल्याचे समोर आले आहे.

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील बाजारपेठा दिवाळी साहित्यांनी सजल्या आहेत. ठाणे शहरातील गोखले रोड, नौपाडा परिसरातील व्यापाऱ्यांकडून विशेष अशी विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. तर, स्थानिक व्यापारी ज्या पद्धतीने दिवाळीसाठी सज्ज झाली आहेत. तसेच सगळ्या वस्तू ग्राहकांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या म्हणून गेले अनेक वर्षांपासून शहरी भागात ग्राहकपेठा भरण्याची परंपरा रुजली आहे.

विविध आयोजकांमार्फत या ग्राहकपेठा भरविल्या जातात. दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे, नवी मुंबई, कल्याण,डोंबिवली शहरात ग्राहकपेठा भरविल्या आहेत. परंतू, गेले एक – दीड वर्षांपासून या ग्राहक पेठांमध्ये ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांची विशेष वाढ झाली असल्याची पाहायला मिळत आहे. घरगुती फराळासह, पणत्या, घरगुती तयार केलेले उटणे असे विविध साहित्य घेऊन या महिला ग्राहकपेठांमध्ये विक्री करतात. ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या मार्फत या महिलांना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर, शहरी भागात अशा ग्राहकपेठांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असते.

ठाणे शहरातील आद्यब्रह्मवादिनी सखी मंच याअंतर्गत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात ग्राहकपेठ भरवण्यात आली आहे. यामध्ये ठाण्यातील सारा फाऊंडेशनने सहभाग घेतला आहे. या फाऊंडेशन ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना उपलब्ध व्हावी यासाठी या ग्राहकपेठेत एक स्टॉल घेतला आहे.

या स्टॉलवर या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होणार आहे. या प्रदर्शनात हस्तकले पासून तयार करण्यात आलेले विविध वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, दिवाळी फराळ, अन्नपदार्थ, कपडे, सौंदर्यप्रसाधनाच्या गोष्टी, सुशोभिकरणाच्या वस्तू, कंदील, पणत्या, रांगोळी असे विविध वस्तू उपलब्ध असणार आहेत. यंदा वाशी येथे ही ग्राहकपेठ भरवली जाणार आहे. तर, ठाणे शहरातही आणखी काही आयोजकांकडून या ग्राहकपेठ्या येत्या काही दिवसात भरविल्या जाणार आहेत. यंदाच्या वर्षी या ग्राहकपेठांमध्ये ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.

या भागातील महिलांचा समावेश

ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील विहीगाव, सावरोली अशा इतर गावपाड्यातील महिलांचा या ग्राहकपेठेत सहभाग आहे. या महिलांनी स्वतः खादी पिशव्या, दिवाळीचे घरगुती उटणे, दिवाळी फराळ तयार केले आहेत. तसेच पणत्या देखील रंगवून प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत.

आदिवासी महिलांची मेहनत सर्व समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहचवणे. त्यांनी तयार केलेले साहित्य लोकांनी विकत घेऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करावे या उद्देशाने ग्राहक पेठांमध्ये आदिवासी महिलांचे प्रतिनिधीत्व करणारे स्टॉल मांडले जातात. – सारंगी महाजन, अध्यक्ष तथा संस्थापिका, सारा फाऊंडेशन, ठाणे