शहापूर : युवा कौशल्य योजनेचे प्रशिक्षणार्थी, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी व मानधन तत्वावर काम करणारे, बालविकास प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून थकल्याचे समोर आले आहे. वेतन थकविल्यामुळे या कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे गृहकर्जाचे हप्ते थकित आहेत. तर काही कर्मचाऱ्यांना मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे असा प्रश्न पडला आहे.

शासनाच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मानधन व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, तालुका समूह संघटक, गट समन्वयक यांना मार्च, एप्रिल या दोन महिन्यांचे मानधन मिळाले नसून पेसा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविकांना डिसेंबर २०२४ पासून मानधन मिळलेले नाही. तर एकात्मिक बालविकास प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या मुख्यसेविका यांचे मार्च महिन्याचे वेतन मंगळवारी दुपारी जमा झाले. त्यामुळे आता एप्रिल महिन्याचे वेतन कधी मिळणार याची चिंता त्यांना आहे.

वेतन आणि मानधन थकविल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना कारावा लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज घेतले आहे. त्यामुळे या कर्जाचे हप्ते देखील थकित आहेत. तर काहीजणांच्या कुटुंबात विविध समारंभ आहेत. त्यामुळे समारंभ साजरे करण्यासाठी त्यांना इतरांकडून उसने पैसे घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, आता मुलांच्या शाळा तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्याचे शुल्क भरणेही कठीण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवा कौशल्य योजनेंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना देखील दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. कंत्राटी शिक्षकांना देखील वेतन मिळविण्यासाठी धडपड करावी लागली. वीस हजार रुपये वेतन असताना पदरात पंधरा हजार टाकून तोंडाला पाने पुसण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.