नागपूर : पुष्पा चित्रपटात चंदन तस्करी काय असते आणि त्याच्यातून किती मोठी कमाई असते हे पुढे आले. त्यामुळे चंदन तस्करांनी पैसे कमवण्याच्या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी राज्यपालांच्या निवासस्थानासह सरकारी कार्यालयापर्यंत चोरी करण्याची मजल गाठली. आता गोरेवाडाचे राखीव जंगल तस्करांनी लक्ष्य केले आहे.गोरेवाडा प्रकल्पातील राखीव वनातून तब्बल १५ ते १७ लाख रुपये किंमतीच्या चंदनाच्या झाडांची तस्करी उघडकीस आली. जप्त करण्यात आलेले चंदनाचे लाकूड सुमारे आठशे किलो असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, गोरेवाडा प्रशासनाने मात्र केवळ साडेपाच लाख रुपये किंमतीचेच चंदनाचे लाकूड चोरीला गेल्याचा दावा केला आहे.

गोरेवाडा जंगलातील चंदनाची झाडे तस्करांचे लक्ष्य ठरली आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास प्रकल्पातील हंगामी वनमजूर याठिकाणी गस्त घालत होते. यावेळी त्यांना आरोपी जंगलातील जंगलातील चंदनाची झाडे तोडून पोत्यात ठेवताना दिसले. वनमजूर त्याठिकाणी पोहोचताच नऊ आरोपी पळून गेले. तर विकी राजपूत या एका आरोपीला पकडण्यात वनमजूरांना यश आले. यानंतर या मजूरांनी गोरेवाड्याचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर राऊत यांना घटनेची माहिती दिली. यावेळी इतर कर्मचाऱ्यांना याठिकाणी पाठवण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरुन दोन दुचाकी जप्त केल्या असून चंदनाची लाकडेही जप्त केली.

घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींमध्ये तारेसिंग पवार, जय मदन पवार, शेतकरी राजकुमार मारवाडी, आदर्श टाकल्या पवार, ऋतिक कुमार पवार, अमितकुमार पवार, राजा डेंगालाल पवार, देवीचंद धुवलाल मारवाडी, घंट्यालाल कुमार पवार यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी काटोल येथील रहिवासी आहेत. आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता १८ ऑगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अन्वये वनगुन्हा नोंदवण्यात आला. वनविकास महामंडळ गोरेवाडा प्राणीसंग्रहालय लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला, विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक व्यवस्थापक कुलदीप शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी आरती पुनसे, वनपाल स्वाती अवन्डकर, वनरक्षक बी.ए. साखरकर, वनरक्षक संदीप कदम, वनरक्षक अनिता गुंडे करत आहेत.

तस्करीच्या ठिकाणाच्या आसपास आणखी चंदनाची झाडे तोडली आहेत का, याचा तपास आम्ही करत आहोत. यातून आणखी आकडा समोर येऊ शकतो. २०२१-२२ मध्ये राजभवन येथेही चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती, त्याच प्रकरणातील हे आरोपी असावेत असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी आरती फुनसे यांनी व्यक्त केला.