कल्याण : घराच्या पाठीमागील बाजूस लाकडे का ठेवली आहेत, असे प्रश्न करून कल्याण जवळील सापाड गावात एका स्थानिकाने एचपी गॅस एजन्सीच्या वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्या चालकाला बुधवारी रात्री मारहाण केली. मारहाणीत पायाला दुखापत झाल्याने चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आता सुस्थितीत आहेत.कल्पेश मारूती भोईर असे मारहाण करणाऱ्या रहिवाशाचे नाव आहे. सोमनाथ गायकवाड (३९) असे जखमी चालकाचे नाव आहे. आपल्या कुटुंबीयांसह ते सापाड गावात राहतात. खडकपाडा पोलीस ठाण्यात सोमनाथ यांनी या मारहाण प्रकरणी तक्रार केली आहे.

सोमनाथ गायकवाड यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की बुधवारी आपण कामानिमित्त बाहेर होतो. आपणास पत्नी मोनिका गायकवाड हिने फोन करून सांगितले की आपले शेजारी कल्पेश मारूती भोईर हे घरी आले आहेत. ते आपणास घरीबोलविण्याची मागणी करत आहेत. घराच्या पाठीमागील बाजुला लाकडे का ठेवली आहेत, अशी विचारणा करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री कामावरून घरी परतल्यावर चालक सोमनाथ गायकवाड हे रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान कल्पेश भोईर यांनी कसली विचारणा केली आहे म्हणून माहिती घेण्यासाठी गेले. त्यावेळी सोमनाथ यांनी कल्पेश यांना आपणास कशासाठी बोलविले आहे. काय झाले आहे, अशी विचारणा करताच कल्पेश भोईर यांनी हातामधील वस्तुने सोमनाथ यांच्या पायावर फटका मारला. पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. सोमनाथ यांना तातडीने नातेवाईकांंनी रुग्णालयात नेले. या मारहाण प्रकरणी सोमनाथ यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.