लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: शहरातील अपगांना महापालिकेकडून वाटप करण्यात येणाऱ्या चहा स्टाॅल वाटप योजनेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. या योजनेचे काम देण्यात आलेल्या मे.टी स्टॉल ऑनर्स वेल्फेअर असोशिएशन या संस्थेने तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत गरजू अपंगांना बाजूला सारून मर्जीतील आणि राजकीय वरदहस्त असलेल्या अपंगांचा समावेश केल्याचा गंभीर आरोप संघटनांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच संघटनांनी नोंदविलेल्या हरकतीनंतरही जाहिरातीशिवाय स्टॉलचे वाटप करण्यात आल्याने संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाने मात्र आरोप फेटाळून लावले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील अपंगांना चहाचे स्टॉल वाटप करण्यात येणार आहेत. स्वारस्य अभिव्यक्ती देकार तत्वावर अपंगांना सक्षम करण्याच्या उद्देशातून ही योजना राबविण्यात येत आहे. हे स्टॉल उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून जागा देण्यात येणार असून त्याचे संपूर्ण काम मे.टी स्टॉल ऑनर्स वेल्फेअर असोशिएशन या संस्थेस देण्यात आले आहे. या संस्थेने लाभार्थींची यादी तयार केली आहे. परंतु या यादीत घोटाळा झाल्याचा संशय संघटनांनी व्यक्त केल्यानी ही योजनाच अडचणीत आली आहे.
हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक, रहिवाशांना मागील सहा वर्षांचा जीएसटी भरण्याच्या नोटिसा
या संस्थेने तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत गरजू अपंगांना बाजूला सारून मर्जीतील आणि राजकीय वरदहस्त असलेल्या अपंगांनाच समावेश केला असून या यादीत घोळ असल्याचा आरोप अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे समयन्क मोहम्मद युसूफ खान यांनी केला होता. त्याच धर्तीवर प्रहार अपंग क्रांती संस्थाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश मदन साळवी, दिव्यांग शिवक्रांती सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मुकेश घोरपडे यांनीही तक्रार केल्या आहेत.
या तिन्ही संघटनांनी हरकत नोंदवून जाहिरात काढून स्टॉलचे वाटप करण्याची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप युसूफ खान यांनी केला आहे. ही योजना राबविताना ठाणे महापालिकेने याबाबत स्थानिक तथा प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन अपंगांकडून अर्ज मागविण्याची गरज होती. परंतु, तसे करण्यात आलेले नाही. त्यामुळे जी दोनशे लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे. ती यादी कंपनीच्या मर्जीतील लोकांची आहे.
हेही वाचा… टिटवाळ्यातील म्हाडाच्या भूखंडावरील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा निर्णय
तसेच, काही स्वयंभू अपंग नेत्यांच्या सांगण्यावरुन ठराविक लोकांना पात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आधी तयार केलेली यादी रद्द करून नव्याने यादी जाहीर करावी, अशी मागणीही युसूफ खान यांनी केली आहे. दरम्यान, जाहिराती मागवून लाभार्थी यादी जाहीर करावी. दहा वर्षानंतर अपंगांना कसे पुन:र्वसीत करणार, याची माहिती देण्यात यावी. अन्यथा, कोणतीही पूर्वसूचनेविनाच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत चहा स्टाॅल योजनेसाठी अपंगांकडून अर्ज मागविण्यात आले होते. नियम आणि पुरावे याआधारे अर्जदारांची पात्र व अपात्रता निश्चित करून यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे संघटनांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून हे आरोप चुकीचे आहेत. – दशरथ वाघमारे, समाज विकास अधिकारी, ठाणे महापालिका