कल्याण – उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कोणत्याही परवानगीविना विद्यार्थ्यांना वाहनांमध्ये कोंबून शाळेत नेणाऱ्या खासगी वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या चार दिवसांपासून आक्रमक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत १२१ विविध प्रकारच्या वाहन चालकांवर दंडात्मक आणि ही वाहने जप्तीची कारवाई उपप्रादेशिक परिवहन विभाग कल्याण विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांनी केली आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी वाहनाचा वापर करायचा असेल तर संबंधित वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तशा परवानग्यांची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा, पलावा, शिळफाटा, २७ गाव हद्दीतील अनेक वाहन मालक उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आवश्यक परवानगीविना विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहनातून वाहतूक करत होते. या वाहनांचे चालक प्रमाणपेक्षा अधिक विद्यार्थी वाहनात कोंबून सुसाट वेगाने वाहने चालवित असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या होत्या. एका वाहनात २० ते २५ विद्यार्थी कोंबून भरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला.

विद्यार्थ्यांची शाळेत नियमबाह्य वाहनातून वाहतूक करणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी गेल्या चार दिवसापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी मोटार वाहन निरीक्षक प्रशांत देवणे, अभिजीत मांजरे, अमित नलावडे, सुप्रिया गावडे, पूनम मोरे, अजित येणारे, मोहित मकवान यांची विशेष तपासणी पथके तयार केली. ही पथके गेल्या चार दिवसांपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, मलंग रस्ता, पलावा, शिळफाटा, काटई, बदलापूर रस्ता परिसरात शाळेचे प्रथम सत्र सुरू होण्याच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहेत.

या तपासणी दरम्यान विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस, ओमनी वाहने, बंदिस्त जीप अशा एकूण १२१ वाहनांकडे विद्यार्थी वाहतुकीची उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी नव्हती. अशा सर्व नियमबाह्य वाहन मालकांवर अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. मोटार वाहन कायदा १९८८, शालेय शाळा बस नियमावली २०११ च्या तरतुदीप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी सांगितले.

विद्यार्थी वाहतुकीसाठी खासगी वाहन चालक मनमानी पध्दतीने पैसे उकळत होते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरात विद्यार्थी वाहतुकीच्या माध्यमातून चांगली मिळकत होत असल्याने अनेक वाहन मालकांनी आपल्या मोटारी विद्यार्थी वाहतुकीसाठी जुंपल्या होत्या. हे सर्व वाहन मालक आता अडचणीत आले आहेत.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात अनेक वाहन मालक नियमबाह्य पध्दतीने विद्यार्थी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी होत्या. अशा वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. १२१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढे दररोज सकाळ, दुपारच्या सत्रात सुरू राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.