कल्याण – शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित व्हावीत, त्यांच्या जाणिवा विकसित व्हाव्यात या उद्देशाने येथील उंबर्डे येथील शेठ हिराचंद मुथा शैक्षणिक ट्रस्ट संचालित मुथा सी. बी. एस. सी. शाळेने आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. कल्याण, मुंबई परिसरातील २० हून अधिक शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

एकूण ४२ प्रकल्प यावेळी मांडण्यात आले होते. या प्रदर्शनातील बहुतांशी विज्ञान प्रकल्प पर्यावरण संवर्धन, उर्जा बचत, पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, निसर्गाची हानी टाळण्यासाठी शाडु्च्या मातीपासून तयार केलेल्या गणपती मूर्तींचे महत्व, उद्यान, बगिचांमधील वृक्ष संवर्धन, वृक्षारोपणाचे महत्व, वातावरण, समुद्री चमत्कार, पवनचक्क्यांंची वीज असे पर्यावरणस्नेही होते.

कल्याण शहर परिसरातील सुमारे दोन हजाराहून अधिक नागरिक, पालकांनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उपक्रमांसाठी प्रोत्साहित केले. या आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन उपक्रमाला शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा, शाळेच्या विश्वस्त व सनदी लेखापाल अन्वेषा मुथा, प्राचार्या सपना गादिया, उपप्राचार्या दीपाली कांबळे उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्ये अधिक विकसित झाली आहेत. लहान शाळकरी मुलाला एखादा मोबाईल मधील किंवा तंत्राचा प्रश्न केला तर तो झटकन अचूक उत्तर देतो. ही प्रगती खरच कौतुकास्पद आहे. अशा गतिमान विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या विज्ञानविषयक जाणिवा अधिक प्रगल्भ करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे असते. त्यासाठी मुथा सी. बी. एस. सी. शाळेने हा आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आता काळाची गरज असलेले पर्यावरण संवर्धनाचे कौतुकास्पद विषय हाती घेतले. त्याची मांडणी केली आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना अशा उपक्रमाच्या माध्यमातून एका व्यासपीठावर आणले की त्यांंना प्रोत्साहन मिळते. आपली बौध्दिक पातळीची त्यांंना जाणीव होते. त्यामुळे मुथा शाळेन हा उपक्रम आयोजित केला, असे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी सांगितले.

क्रमिक अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांचे क्रीडा, वक्तृत्व असे विविधांगी गुण शालेय जीवनापासून विकसित झाले पाहिजेत म्हणून मुथा महाविद्यालय, शाळांमधून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विविध क्षेत्रातील मान्यवर आणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. अनेक स्पर्धांमध्ये मुथा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून बक्षिसे, पुरस्कार पटकावले आहेत.