डोंबिवली– डोंबिवली जवळील २७ गावातील निळजे गाव हद्दीतील एक गृहसंकुलात उद्वाहनच्या खड्ड्यात पडून एक ५० वर्षाचा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूला उद्वाहनची देखभाल दुरुस्तीची सेवा देणाऱ्या कंपनीचे मालक यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत मयत सुरक्षा रक्षकाच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात कंपनी विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

शारदा मुकुंद साहु (५०, रा. परी प्लाझा, निळजे, लोढा हेवन, निळजे रेल्वे स्थानका जवळ, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. शारदा यांनी पती मुकुंद यांच्या मृत्युला उद्वाहनची देखभाल दुरुस्तीची सेवा देणाऱ्या साईदीप सर्व्हिसेस सिक्युरिटी कंपनीचे मालक शिवाजी खुने व इतर इसम यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. ६ ऑगस्ट रोजी एलोरा, कासा बेला, गोल्ड लोढा पलावा, डोंबिवली पूर्व येथे ही घटना घडली.

हेही वाचा >>> समाधान हॉटेलच्या व्यवस्थापकावर तरुणांचा हल्ला ; काटई-बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील घटना

पोलिसांनी सांगितले, शारदा साहु यांचे पती एलोरा कासा बेला सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. सोसायटीत उद्वाहन देखभाल दुरुस्तीचे काम साईदीप सिक्युरिटी कंपनीकडून सुरू होते. हे काम सुरू असताना साईदीप कंपनीच्या मालक व कर्मचाऱ्याने मुकुंद साहु यांना बंद पडलेले उद्वाहन सुरू करण्यासाठी मुकुंद यांना इमारतीच्या पहिल्या माळ्यावर पाठविले. बंद पडलेल्या उद्वाहनचा दरवाजा उघडत असताना मुकुंद तोल जाऊन पहिल्या माळ्यावरुन ते उद्वाहनच्या खड्ड्यात पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन हाताला मार लागला. त्यांच्यावर अनेक दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या सगळ्या प्रकाराला साईदीप कंपनीचे मालक आणि त्यांचा साथीदार इसम जबाबदार असल्याचा ठपका ठेवत शारदा साहु यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गेल्या वर्षभरात डोंबिवलीत इमारतींमधील उद्वाहनच्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.