ज्येष्ठ नगरसेवकाकडून पक्षातील नेत्यांना घरचा आहेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : महापालिका करोना मृतांची संख्या लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली असतानाच, त्यांना महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी घरचा आहेर दिला आहे. आकडे चुकीचे प्रसिद्ध केले जातात, याला काही पुरावा दिला नसून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालते, असे मत पाटणकर यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केले. यानिमित्ताने भाजपच्या नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचे चित्र पुढे आले आहे.

ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांची भाजपच्या शिष्टमंडळाने चार दिवसांपूर्वी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान महापालिका क्षेत्रातही मृतांची संख्या वाढत आहे. मात्र, महापालिकेकडून किमान ५० मृत्यूची संख्या कमी दाखवल्याचा दावा शिष्टमंडळाने या वेळी केला. त्यावर राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे सांगत त्यावरून आकडय़ांची लपवालपवी सुरू असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच महापालिका करोना मृतांची संख्या लपविण्याचा प्रयत्न करीत असून महापालिकेने मुंब्रा परिसरातील जाहीर केलेल्या मृतांच्या संख्येत मोठा फरक आहे. करोना नियंत्रणात आणला असल्याचे दाखविण्यासाठी राजकीय नेत्यांची ही बदमाशी आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. तर ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ अशी स्थिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची झाल्याचा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला होता. या संदर्भात समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या बातमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवून दोन्ही नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

‘करोनाबाबतच्या नोंदी बरोबर’

ठाणे महापालिकेत करोना रुग्णांची व करोनामुळे मृतांची संख्या चुकीची दिली जाते किंवा कमी दाखविली जाते, हा आरोप चुकीचा असल्याचे मत पाटणकर यांनी प्रतिक्रियेमध्ये व्यक्त केले. करोनाबाबतीत सर्व नोंदी बरोबर ठेवल्या जात आहेत. आकडे चुकीचे प्रसिद्ध केले जातात, याला काही पुरावा दिला नाही. तसेच कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे कामकाजही चांगल्या पद्धतीने चालते. राजकारण म्हणून आरोप करणे हे तितकेसे योग्य नाही, असे वाटते. करोनासाठी किंवा कळवा रुग्णालयात जे डॉक्टर, परिचारिका अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत, त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रतिक्रियेमुळे भाजपच्या नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचे चित्र पुढे आले आहे.

आमच्या पक्षामध्ये कोणतेही मतभेद किंवा वाद नाहीत. आम्ही सर्वजण एकत्रच आहोत. संबंधित विषयावर केवळ माझे मत व्यक्त केले आहे.

– मिलिंद पाटणकर, नगरसेवक, भाजप

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior bjp corporator milind patankar slams kirit somaiya over his coronavirus remark zws
First published on: 26-06-2020 at 00:11 IST