कल्याण – कल्याण पश्चिमेत सिध्देश्वर आळी भागात शुक्रवारी दुपारी घरी पायी चाललेल्या एका वृध्दाला दोन इसमांनी भुरळ घालून, बोलण्यात गुंतवून लुटल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. काही अंतर पुढे निघून गेल्यानंतर वृध्दाला आपल्या बोटातील सोन्याची अंगठी गाहळ असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना वाटेत भेटलेल्या दोन इसमांनी आपणास भुरळ घालून ती लुटून नेल्याचा संशय आला. त्यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुध्द तक्रार केली आहे.
मागील काही महिन्यांपासून रस्त्याने पायी जाणाऱ्या पादचारी ज्येष्ठ, वृध्द महिला, पुरूषांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. बँकेतून बाहेर पडणारे, बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या पादचारी वृध्द पुरूष, महिलेला यावेळी भुरट्यांकडून अधिक लक्ष्य केले जाते. कल्याण पश्चिमेत सुभाषनगर परिसरात राहणारे उदय नारायण जोशी (७३) शुक्रवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या दरम्यान दूध डेअरीमधून दूध घेऊन पायी घरी चालले होते. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेसमोरील रस्त्यावरून सिध्देश्वर आळीकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात असताना तक्रारदार उदय जोशी यांना चाळीस वर्षाचे दोन इसम भेटले.
त्यांनी अचानक उदय जोशी यांना थांबवून, आपली खूप वर्षाची ओळख आहे असे दाखवून तुमचे मूळ गाव कोणते आहे. तुम्ही काम काय करता असे प्रश्न केले. हे प्रश्न करत असताना एका भुरट्याने उदय जोशी यांचा हात हस्तालोंदन करण्यासाठी आपल्या हातात घेतला होता. त्यावेळी उदय जोशी यांच्या हातात अठरा हजार रूपये किमतीची पाच ग्राम वजनाची पुष्कराज खडा असलेली पाच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी होती. जोशी यांच्याशी बोलत असताना भुरट्यांनी जोशी यांना भुरळ घालून हात चलाखी करून त्यांच्या बोटातील सोन्याची अंगळी काढून घेतली होती. भुरट्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिल्यानंतर उदय जोशी पु्न्हा आपल्या घराच्या दिशेने चालू लागले.
काही अंतरावर गेल्यानंतर तक्रारदार जोशी यांना आपल्या हातात आपली सोन्याची अंगठी नसल्याचे दिसले. रस्त्याला चालताना कोठे पडली म्हणून त्यांनी तपास केला. पण त्यांना अंगठी आढळली नाही. त्यामुळे वाटेत भेटलेल्या दोन इसमांनी आपल्याला बोलण्यात गुंतवून आपणास हस्तालोंदन करण्यास भाग पाडले. त्याचवेळी त्यांनी आपल्या हाताच्या बोटामधील सोन्याची अंगठी काढून घेतली असावा असा संशय आला. उदय जोशी यांनी त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन दोन इसमांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हवालदार पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.