डोंबिवली – उपजत अंगभूत कौशल्य, विचारातून जे रेखाटून रंगविले जाते. तेच चित्राचे खरे रूप आहे. चित्र हा व्यायाम आहे. अभ्यास नाही. आपल्या तीक्ष्ण नजरेतून जे दिसते ते, निसर्ग परिसर न्याहळून जे कागदावर आपल्या अंतरमनातून उतरते ते खरे चित्र, असे मत ज्येष्ठ चित्रकार आणि लेखक प्रभाकर कोलते यांनी रविवारी येथे सडेतोड शैलीत व्यक्त केले.
गणेश कुलकर्णी परिवार प्रस्तुत आत्मभान शीर्षकांतर्गत ज्येष्ठ चित्रकार आणि लेखिका उमा कुलकर्णी आणि ज्येष्ठ चित्रकार, लेखक प्रभाकर कोलते यांच्याशी संवादाचा कार्यक्रम डोंबिवलीतील बालभवनमध्ये गणेश कुलकर्णी यांनी आयोजित केला होता. यावेळी सुसंवादक कनक वाईकर, गणेश कुलकर्णी यांनी दोन्ही वक्त्यांशी संवाद साधला.
मोठ्या कला महाविद्यालय, शाळा वर्गांमध्ये जाऊन चित्र शिकलो आणि चित्र काढायला लागलो, असे कोणी म्हणत असेल तर ते सर्वथा चुकीचे आहे. या उलट ही व्यवस्थाच नको, अशा ठाम मताचे आपण आहोत. असे आपण बोलतो त्यावर समाजात तिखट प्रतिक्रिया आपल्याविषयी व्यक्त केल्या जातात. त्याला पर्याय नाही. प्रत्येकामध्ये उपजत अंगभूत कौशल्ये असतात. त्या माध्यमातून तो शिकत जातो. स्वताला विकसित करतो. तयार होतो. चित्र रेखाटायला लागतो. तेव्हा त्या चित्राला खरे रूप येते, असे चित्रकार कोलते यांनी सांगितले.
जे. जे. कला महाविद्यालयात प्राचार्य शंकर पळशीकर यांच्यासारख्या कठोर शिस्तीच्या गुरूच्या तालमीत खूप शिकायला मिळाले. कोणत्याही साच्यात त्यांनी आम्हाला अडकून ठेवले नाही. तुम्हाला हवे ते करा. असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे क्रमिक अभ्यासक्रमातील आपणास किती येते यापेक्षा आपल्या उपजत अंगभूत कौशल्यातून आपण चित्र कशी रंगवतो याकडे मी नेहमी भर दिला. त्यामुळे आपल्या कलेला वेगळा आयाम मिळाला. त्यामधून खूप शिकायला मिळाले. उत्तर पत्रिका सोडविताना किती गुण मिळतील, यापेक्षा आपल्या विचारातून आपण हवे ते चित्र कसे काढू, यावर नेहमी भर दिला, असे चित्रकार कोलते यांनी सांगितले.
कला महाविद्यालयात आता शिकवतात, त्यांना बोलता येत नाही. शिक्षक चित्रांचे विषय देतात मुले त्यात अडकून पडतात. कलेचे शिक्षण घेता तर कलाआस्वादक मुलांनी झाले पाहिजे. वैविध्यपूर्ण वाचन केले पाहिजे. मराठी मुले वाचन करत नाहीत, अशी खंत कोलते यांनी व्यक्त केली. गुरू पळशीकर यांचा एक पाठ पण भरपूर दूरदृष्टी आम्हाला देऊन जायचा. त्या तुलनेत आता काय मिळते, असा प्रश्न कोलते यांनी केला. आता कला महाविद्यालयांमध्ये आनंदी आनंद आहे. विद्यार्थ्यांनी त्या विषयी आवाज उठविला पाहिजे. जो उघड बोलतो त्याचा समाचार घेण्याची भाषा केली जाते, हे खेदजनक आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत होणार प्रवेश?
चित्र प्रदर्शनामध्ये धावत्या स्वरुपात चित्र पाहिले जाते. त्याला अर्थ नाही. चित्र हे पाहायचे असते. त्यामधील अंतर्भाव समजून घ्यायचे असतात. ते समजून सांगणारा कोणी आपल्याकडे नाही. युरोपात चित्रप्रदर्शनांना तुफान गर्दी होते. त्या चित्रांजवळ मार्गदर्शक असतात. ते चित्रांचे अंतरंग पटून सांगतात, असे कोलते यांनी सांगितले. चित्रकार गायतोंडे यांची भेट, पाॅल गोग्या इतरांच्या चरित्र वाचनातून खूप शिकण्यास मिळाले, असे कोलते यांनी सांगितले.
फोटो ओळ
डोंबिवलीत ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, उमा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधताना गणेश कुलकर्णी, कनक वाईकर.