वसईतले सर्वात पहिले चर्च म्हणून सांडोर येथील सेंट थॉमस चर्च ओळखले जाते. १५६५मध्ये पोर्तुगीज नोबल महिला डोना आयरिन यांच्या मनात सांडोर येथे चर्च बांधण्याची संकल्पना आली. आजही चर्चच्या दर्शनी भागात त्यांच्या नावाची पाटी दिसते. सांडोर येथे ‘अवर लेडी ऑफ हेल्प’ या नावाचे नवीन चर्च बांधण्यात आल्यानंतर ११ नोव्हेंबर १५६६ रोजी या चर्चमध्ये पहिला मिस्सा संपन्न झाला. मिशनरी वसई किल्लय़ातून येऊन दर रविवारी या ठिकाणी मिस्सा बोलत असत. त्यानंतर काही महिन्यांनी पोर्तुगीज नोबल लेडी डॉना आयरिन यांनी हे चर्च आणि आजूबाजूची मालमत्ता २९ एप्रिल १५६७ साली जेजुइट धर्मगुरूंच्या ताब्यात दिले.

भारताचे पहिला संत गोन्सालो गार्सिया हे त्यावेळी १० वर्षांचे होते. त्यावेळी वेदिसेवक म्हणून सेंट थॉमस चर्चमध्ये येत होते. १५७१ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी ते जेजुईट्स धर्मगुरूबरोबर जपानला गेले. त्यानंतर १५९७मध्ये नागासकी येथे त्यांचे निधन झाले. १५७२ मध्ये फादर अंतोनि डिकोस्टा यांनी या ठिकाणी सेंट थॉमस यांच्या नावाने नवीन मोठे चर्च उभारले आणि पहिला सण हा २१ डिसेंबर १५७३ रोजी साजरा केला गेला. फा. पेद्रो दि अल्मेडा एस.जे हे सेंट थॉमस चर्चचे पहिले धर्मगुरू (१५७४) होते.

त्यानंतर १५७४ ते १६०६ दरम्यान या चर्चमधून मर्सेस, रमेदी, पापडी, पाली व माणिकपूर या ठिकाणी चर्च बांधली गेली. या चर्चचा दर्शनी भाग १८५८ साली बांधला गेला. आणि समोरचा पोर्च हा १९७२मध्ये बांधण्यात आला. पूर्वी या चर्चचा सण हा २१ डिसेंबर हा होता. कारण या दिवशी संत थॉमस यांना मद्रास या ठिकाणी ठार मारण्यात आले होते.

सेंट थॉमस चर्चच्या धर्मग्रामात सामान्य लोकांसाठी असलेली पहिली ग्राहक सहकारी संस्था १९५० साली स्थापन झाली. १९५४ साली शिक्षण साहाय्यक मंडळाची स्थापना झाली. १९५८ ला लोकसेवा मंडळाच्या वतीने चर्च धर्मग्रामात हॉल बांधण्यात आला. १९८२ साली आजूबाजूच्या सर्व दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्याने व धर्मगुरूंच्या पुढाकाराने कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल सुरू करण्यात आले. कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलची उभारणी मो. तवारीस व फादर भंडारे यांनी आपल्या चर्चची जागा देऊन केली तसेच मो.मेंडीस यानी देवतलाव या ठिकाणी घेतलेल्या जागेवर माध्यमिक शाळा असून आज ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व या मध्यवर्ती ठिकाणी फादर बर्नाड भंडारे यांच्या नावाने बांधलेल्या प्रशस्त सभागृहाचा उपयोग निरनिराळ्या कामासाठी केला जातो.

५००० लोक प्रार्थनेसाठी

सेंट थॉमस चर्चचे सध्याचे धर्मगुरू डॉ. जॉन फरगॉस आहेत. ते  कडक शिस्तीचे असून त्यांनी अगदी कमी कालावधीतच सर्वाचा विश्वास संपादन केला. म्हणून चर्चच्या सर्व कामकाजामध्ये बालगोपाल, तरुण तरुणी, ज्येष्ठ मोठय़ा उत्साहाने भाग घेतात. हे पहिले असे धर्मगुरू आहेत जे मिस्सा सुरू होण्याआधी दरवाजात उभे राहून मिस्साला येणाऱ्या भाविकांचे स्वागत करतात. आज या चर्चच्या धर्मग्रामामधील लोकसंख्या ७००० असून ती ४२ गावांमध्ये पसरली आहे. चर्चमध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी मिस्सा म्हटला जातो. ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, स्त्रियांची सोडॅलिटी, बालसंघ, शिक्षक संघटना अशा विविध संघटना चर्चमध्ये विविध पातळीवर कार्य करतात. लग्नसोहळे, बाप्तिस्मा, प्रथम ख्रिस्त शरीर, मृत्यू इत्यादी विधी चर्चमध्ये साजरे केले जातात. गुडफ्रायडे आणि नाताळ या सणांना एकाच वेळी ५००० लोक प्रार्थनेसाठी बसतात. चर्चचा आतील भाग प्रशस्त आणि सुंदर आहे. अनेक संतांचे पुतळे या चर्चमध्ये आहेत.

डिसेंबर महिन्यात सण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई धर्म प्रांतात अलीकडेच ऑक्टोबर २०१६ मध्ये मिशन संडे पाळला गेला. त्यामध्ये भाविकांनी ९ लाख रुपयांचे दान दिले. तसेच येथील दफनभूमीसाठी ३० लाखांची आवश्यकता असताना भाविकांनी ५० लाख रुपये जमा करून दिले. या चर्चचा सण हा दरवर्षी डिसेंबर महिन्यात येतो. यंदा हा सण ११ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.