लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: भिवंडी येथील शासकीय निरीक्षण आणि बालगृहात पुनर्वसनासाठी वास्तव्यास असलेल्या काही अल्पवयीन मुलांचे तिथे शिकविणाऱ्या सुमारे चाळीस वर्षीय शिक्षिकेकडूनच लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेवर मुलांच्या तक्रारीनंतर भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षिकेला काही महिन्यांपूर्वी गैरवर्तनाबाबत निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी निरीक्षण गृहातील कर्मचारी आणि मुलांच्या सुरु असलेल्या सविस्तर चौकशी दरम्यान हे सर्व धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्हा महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत पुढील चौकशी सुरु आहे.

भिवंडीतील कचेरीपाडा येथे शासकीय निरीक्षण गृह आणि बालगृह आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मुलांच्या देखभालीसाठी आणि शिक्षणासाठी शासनातर्फे अनुदानित संस्था कार्यरत आहे. या संस्थेतर्फे मुलांना शिक्षण देण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षण गृहात मागील काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एका शिक्षिकेविरोधात मुलांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. तसेच या शिक्षिकेचे सहकर्मचारी आणि नेमणूक करणाऱ्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांबरोबर ही वाद होते. या गैरवर्तनाबद्दल शिक्षेकेचे मागील तीन महिन्यांपूर्वी निलंबन करण्यात आले होते. तर बाल न्यायालयीन आदेशानुसार संबंधित प्रकरणाची जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून चौकशी सुरु होती.

आणखी वाचा- बंदूक विक्रीप्रकरणी दोघांना अटक

या दरम्यान याच चाळीस वर्षीय शिक्षिकेने काही अल्पवयीन बालकांचा लैंगिक छळ केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांनी चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणगृह प्रशासनाकडून संबंधीत शिक्षिकेवर भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. तर यात आणखी एका शिक्षिकेचा समावेश असल्याचा संशय जिल्हा महिला बालविकास विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून याबाबत सविस्तर चौकशी सुरु असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या संपूर्ण प्रकरणामुळे शासकीय निरीक्षण गृहातील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षिकेचे निरिक्षण गृहातील इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसमवेत वैयक्तिक वाद होते. या वैयक्तिक वादाचा वचपा काढण्यासाठी आणि इतर शिक्षकांना मारहाण करण्यासाठी संबंधित शिक्षिकेने निरीक्षण गृहातील एका अल्पवयीन मुलाला प्रवृत्त केल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. तर ‘तू असे केल्यास तुझ्यासमवेत शरीरसंबंध प्रस्थापित करेल’ असे अमिष ही दिल्याची माहिती एका पीडित मुलाने चौकशी दरम्यान जिल्हा महिला बालविकास विभागाचे अधिकारी आणि पोलिसांना दिली आहे.