सध्या गाजत असलेल्या ‘का रे दुरावा’ या मालिकेतील तिलोत्तमा या भूमिकेमुळे अभिनेत्री शलाका पवार लोकप्रिय ठरली आहे. मूळच्या बदलापूरच्या राहणाऱ्या शलाकाची अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर सुरू झाली. ‘यदा कदाचित’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘जादू तेरी नजर’, ‘दिवसा तू रात्री मी’ यांसारख्या नाटकांतून अभिनय करण्याबरोबरच ‘फू बाई फू’चे दुसरे पर्व, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ ही मालिका यातूनही तिने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ‘गाणे तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही तिने केले असून आगामी ‘मर्डर मेस्त्री’ या मराठी सिनेमातही ती झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’ माझ्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे – माझ्या आजोबांचे मित्र आणि अभिनेते रवी भाटवडेकर बदलापुरात राहत होते. जुन्या नाटकांतून स्त्री पात्र ते साकारत असत. मी इंग्रजी माध्यमात शिकत असल्यामुळे माझ्याकडून त्यांनी ‘संगीत स्वयंवर’ तसेच गाजलेल्या जुन्या नाटकांतील लांबलचक वाक्ये, संवाद, नाटय़संहितेतील उतारे याचा अर्थ सांगून ते कसे सादर करायचे हे शिकविले. नऊवारी नेसण्यापासून ते मराठी संस्कृतीविषयक अनेक गोष्टी शिकविल्या. त्याचा उपयोग नेहमीच मला मराठी रंगभूमीवर तसेच अन्य माध्यमांत अभिनय करताना होतो. पुढे एका नाटकामधील भूमिका पाहून दत्ता घोसाळकर यांनी मला रंगभूमीवरील नाटकांमध्ये भूमिका करण्याबाबत विचारले. संतोष पवारची ओळख त्यानिमित्ताने झाली आणि नाटकातली कारकीर्दही सुरू झाली.
* आवडते मराठी चित्रपट – ‘अशी ही बनवाबनवी’, दादा कोंडके यांचे सर्व चित्रपट, ‘सामना’, ‘पिंजरा’.
* आवडते हिंदी चित्रपट – ‘तारे जमीं पर’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मैंने प्यार किया’.
* आवडती नाटकं – यदा कदाचित, ‘जाणूनबुजून’, ‘मित्र’.
* आवडते दिग्दर्शक – मंगेश कदम, संतोष पवार, सई परांजपे, केदार शिंदे.
* आवडलेल्या मालिका – ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अग्निहोत्र’, ‘देख भाई देख’.
* आवडते चरित्र कलावंत-सहकलावंत – किशोरी अंबिये, प्रशांत दामले, पूर्वा पंडित.
* आवडते नाटककार – राम गणेश गडकरी, बाळ कोल्हटकर, वसंत कानेटकर, संतोष पवार.
* आवडलेली पुस्तकं – जेफ्री आर्चर यांची पुस्तकं, मिलिंद बोकील, शं. ना. नवरे, व. पु. काळे यांची पुस्तकं.
* आवडता खाद्यपदार्थ – गोव्याच्या पद्धतीची फिश करी.
* आवडता फूडजॉइण्ट – कुळगांव-बदलापूरमधील काटदरे हॉटेलचे बटाटवडे.
* ठाणे जिल्ह्यातील आवडता पिकनिक स्पॉट- कोंडेश्वर.
*  बदलापूरविषयी थोडेसे : फातिमा हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत असताना कामगार कल्याण केंद्राच्या व्यासपीठावर कुळगांव-बदलापूरमधील स्थानिक कलावंतांसोबत बालनाटय़ातून छोटय़ा छोटय़ा भूमिका करायला लागले. आमचे देसाई कुटुंबीय बऱ्याच काळापासून बदलापुरात स्थायिक असल्यामुळे आता जरी बदलापूर विस्तारलं असलं तरी देसाई कुटुंबीयांना सगळेच ओळखतात. बदलापुरात लहानाची मोठी झाले असल्यामुळेही मला बदलापूरची ओढ कायम आहे.
शब्दांकन – सुनील नांदगावकर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalaka pawar actress
First published on: 04-07-2015 at 12:18 IST