ठाणे : काही दिवसांपूर्वी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर ठाणे शहरात शरद पवार गटाने बॅनर लावून सुहास देसाईवर टीका केली. या बॅनरवर “एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही”, असा मजकूर लिहिण्यात आला होता. आता, त्याला प्रतिउत्तर म्हणून अजित पवार गटाने देखील शहरात बॅनर लावून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार गटाने शहरात बॅनर लावून सुहास देसाईवर टीका केली आहे. चंदनवाडी , गणेशवाडी परिसरात हे बॅनर लावले असून बॅनरवर, ‘एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर, नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही”, असा संदेश दिला आहे. या बॅनरमधून पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले आहे. या बॅनरची चांगलीच चर्चा परिसरात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष सोडला आहे. त्यांचे नाव न घेता, असंघटित सेलचे अध्यक्ष राजू चापले यांनी बॅनरद्वारे त्यांना फटकारले आहे. आता, या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस मोहसीन शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष वीरु वाघमारे यांनी ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथे बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमुळे शहरात पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

अजित पवार गटाचे बॅनर

शरदपवार गटाकडून शहरात चंदनवाडी आणि गणेशवाडी परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर “एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर, नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही” तसेच “पोरं शाळा सोडून गेली तर शाळा बंद पडत नाही. पुन्हा नव्याने विद्यार्थी घडविण्याचे काम शाळा मास्तर करतो. आमचा मास्तर लय खमक्या आहे.” आणि “डाॅ.जितेंद्र आव्हाड साहेब हे विद्यापीठ आहे; ते कार्यकर्ते घडवतात! असे संदेश दिले होते. या बॅनरला प्रतिउत्तर देत, अजित पवार गटाने कॅडबरी जंक्शन येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर “सर्वांनाच ढ ढ म्हणून पक्षचं ढगात गेलायं.पण, त्या पक्षाच्या ‘रावणाचा’ अहंकार काही मोडत नाही.”असा संदेश लिहित आव्हाडांवर टोला लगावला आहे.