ठाणे : जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी रिक्षामध्ये दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा दिली आहे. मात्र त्यानंतरही शहरातील लोकमान्यनगर, यशोधननगर, किसननगर, ज्ञानेश्वर नगर, वागळे इस्टेट, कापूरबावडी, बाळकुम भागात रिक्षामध्ये चार प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. अनेक रिक्षाचालक मुखपट्ट्याही वापरत नसल्याचे समोर आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात एका रिक्षातून केवळ दोनच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ हजार ८३ रिक्षाचालकांविरोधात कारवाई करून १० लाख रुपयांचा दंड वसूल केला. मात्र या कारवाईनंतरही शहरातील विविध भागांत रिक्षाचालकांकडून चार ते पाच प्रवाशांची वाहतूक करण्याचे प्रकार सुरूच असल्याचे चित्र आहे. वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, यशोधननगर, किसननगर, ज्ञानेश्वरनगर, कापूरबावडी, बाळकुम अशा अनेक ठिकाणी रिक्षाचालक रिक्षातून चार ते पाच प्रवासी घेऊन जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

करोनाचा संसर्ग वाढू लागला तेव्हा रिक्षामध्ये चालकाच्या आसनामागे प्लास्टिकचे आवरण बसविणे महापालिका आणि वाहतूक विभागाकडून सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, शहरातील अनेक रिक्षांमध्ये हे प्लास्टिक आवरण आता दिसून येत नाही.

करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे रिक्षात केवळ दोन प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. पोलिसांकडूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे.  – बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा