ठाणे : शिळफाटा येथील सुमारे ७०० सदनिका असलेल्या एका गृहसंकुलातून ठाणे महापालिकेने कचरा उचलला नव्हता. दिवाळीत येथील रहिवाशांच्या घराबाहेर अक्षरश: कचऱ्याचे ढीग साचले होते. महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या उपलब्ध नसल्याने ही स्थिती झाल्याचे येथील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रहिवाशांना सांगितले. अखेर तीन दिवसांनी एका दक्ष नागरिकाने महापालिका आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर येथील कचरा उचलण्यात आला.
गेल्याकाही वर्षांपासून शिळफाटा भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. शिळफाटा येथील बहुतांश भाग ठाणे महापालिका क्षेत्रातील आहे. दिवाळी निमित्ताने सण-उत्सव सुरु असताना शिळफाटा भागातील ७०० सदनिका असलेले गृहसंकुलात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. दिवाळी निमित्ताने या भागात राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाहुणे आले होते. परंतु संकुलामध्ये दिवाळीच्या कालावधीत तीन दिवस कचरा वाहून नेणारे वाहन आले नाही. त्यामुळे संकुलात मोठ्याप्रमाणात कचरा पसरला होता.
दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. सदनिकाधारकांच्या नातेवाईकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. एका दक्ष नागरिकाने याबाबत तात्काळ ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना संदेश पाठविला. तसेच येथील आमदारांनाही संपर्क साधला. त्यानंतर काही मिनीटांमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येथील कचरा उचलण्यास सुरुवात केली.
भाऊबीज निमित्ताने नातेवाईकांकडे गेलो होतो. तेव्हा तीन दिवस कचरा उचलला नसल्याचे कळाले. त्यानंतर तात्काळ याची माहिती आयुक्त सौरभ राव आणि आमदारांना दिले. अखेर महापालिकेच्या पथकाने कचरा उचलला. – राहुल शिंदे, दक्ष नागरिक.
