डोंबिवली – बारवी धरणाकडून नवी मुंबई शहराकडे शिळफाटा रस्त्याने जाणारी जलवाहिनी शुक्रवारी सकाळी निळजे रेल्वे उड्डाण पूल भागात फुटली. ६० फूट उंचीचे पाण्याचे फवारे या जलवाहिनीतून उडत होते. शेकडो लीटर पाणी या जलवाहिनीतून वाया गेले. ही जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई परिसराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे, असे एमआयडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बारवी धरणाकडून गुरूत्वाकर्षण पद्धतीने जलवाहिन्यांमधून एमआयडीसीकडून कल्याण डोंबिवली, ठाणे, मुंब्रा, कळवा, नवी मुंबई शहरांना पाणी पुरवठा केला जातो. गेल्या दोन वर्षाच्या काळात सात ते आठ वेळा बारवी धरणातून नवी मुंबई, ठाणे शहराकडे जाणाऱ्या जलवाहिन्या काटई बदलापूर रस्ता, काटई नवी मुंबई, ठाणे रस्ते मार्गावर फुटल्या आहेत.
गुरुवारी सकाळी एमआयडीसीची जलवाहिनी शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे पूर्व भागात रखडलेल्या पुलाच्या बाजुला फुटली. ६० फूट उंचीचे पाण्याचे फवारे जलवाहिनीतून बाहेर उडत होते. या जलवाहिनीच्या बाजुला एका नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतींमधील कामगार अचानक पाण्याचे फवारे उडून लागल्याने भिजून गेले. काही हौशी नागरिकांनी उडणाऱ्या उंच पाण्याच्या फवाऱ्यांमध्ये जाऊन भिजण्याचा आनंद लुटला. शिळफाटा रस्त्यावरील अनेक वाहन चालक आपली वाहने संथ करून उंच उडणारे हे फवारे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करताना दिसत होते.
नवी मुंबईकडे जाणारी ही जलवाहिनी एमआयडीसीच्या महापे विभागाच्या अंतर्गत येते. ही माहिती महापे कार्यालयाला समजताच तेथून तात्काळ अभियंते आणि दुरुस्ती पथक घटनास्थळी रवाना झाले. या जलवाहिनीवरून बारवी धरण, जांभुळ जलशुध्दीकरण केंद्राकडून येणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. या जलवाहिनीतील पाण्याची पातळी कमी झाली की मग हे काम तातडीने दुरुस्तीसाठी हाती घेतले जाईल, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. जलवाहिनीत पाण्याची पातळी असली की त्या ठिकाणी काम करणे अवघड जाते. वेल्डिंगसारखी यंत्रणा तेथे वापरणे शक्य होत नाही, असे अधिकारी म्हणाला.
डोंबिवली : बारवी धरणाकडून नवी मुंबई शहराकडे शिळफाटा रस्त्याने जाणारी जलवाहिनी शुक्रवारी सकाळी निळजे रेल्वे उड्डाण पूल भागात फुटली. ६० फूट उंचीचे पाण्याचे फवारे या जलवाहिनीतून उडत होते.https://t.co/ZfyIjgJO7V
— LoksattaLive (@LoksattaLive) August 22, 2025
व्हिडीओ सौजन्य – लोकसत्ता टीम #Maharashtra #Barvidam #navimumbai pic.twitter.com/EirXqUcWEN
जलवाहिनीवर जलवाहिनीतील दाब नियंत्रित करण्यासाठी १०० मीटर अंतरावर व्हाॅल्व्ह असतात. हे व्हाॅल्व्ह हळूहळू सैल होत गेले की त्यामधून पाणी बाहेर येण्यास सुरूवात होते. जलवाहिनीतील अतिउच्चदाबामुळे व्हाॅल्व्हच्या ठिकाणी अचानक पाणी बाहेर फेकण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जलवाहिनीतून अतिउच्चदाबाने पाणी बाहेर फेकले जाते, असे अधिकाऱ्याने सांगितले.