डोंबिवली : मागील ३५ वर्षाच्या कालावधीत मुसळधार पाऊस पडूनही खडी, डांबरीचा रस्ता असताना कधीही कल्याण शिळफाटा रस्ता जलमय झाला नाही. या रस्त्यालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये कधी पुराचे पाणी घुसले नाही. मागच्या पंधरा वर्षाच्या काळात कल्याण शिळफाटा रस्त्यालगत झालेली मोठी अधिकृत गृहसंकुले, या गृहसंकुलांसाठी करण्यात आलेले मातीचे भराव, दिवा, मुंब्रा, शिळफाटा रस्त्यालगतची बेसुमार बेकायदा बांधकामे आणि या रस्त्याच्या दुतर्फा नसलेली गटारे दरवर्षी अतिवृष्टी झाली की शिळफाटा जलमय करत असल्याचे या भागातील जुनेजाणकार सांगतात.
शिळफाटा रस्ता मलंगगड डोंगरांच्या पायथ्याशी आहे. या खोऱ्यातील पावसाचे पाणी नैसर्गिक नाले, ओहळ यांच्यामधून २७ गाव, खोणी भागातून उल्हास खाडीला जाऊन सम्मलित होत होते. मलंगगड परिसर, २७ गाव परिसरात ओसाड माळरान आणि भातशेती एवढेच या भागातील यापूर्वी चित्र होते. अतिमुसळधार पाऊस पडल्यानंतर नैसर्गिक मार्गांमधून माळरानातून पुराचे पाणी झरझरा खाडीच्या दिशेने वाहून जात होते. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारित काही वर्ष शिळफाटा रस्ता होता. या विभागाच्या जुन्या रस्ता बांधणी रचनेप्रमाणे शिळफाटा रस्त्याची पहिली बांधणी झाली होती. त्यावेळी या रस्त्याखाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक तेथे मोऱ्या, नलिका होत्या. हे पाणी शिळफाटा, दिवा, मुंब्रा भागातून खाडीला झरझरा वाहून जात होते.
शिळफाटा रस्त्यालगत मोठ्या गृहसंकुलांसाठी मोठे मातीचे भराव झाले. मलंगगडकडून येणारे नैसर्गिक प्रवाह बंद करण्यात आले. ओहोळ बांधकामांसाठी फिरविण्यात आले. त्यामुळे आता पावसाचे पाणी आपल्या जुन्या मार्गिकेतून वाट मिळेल तसे धावते. या मार्गिकेत अधिकृत टोलेजंग इमारती उभारल्या राहिल्या आहेत. शिळफाटा रस्त्यालगतच्या नवीन वसाहतींचा काही भाग आता मुसळधार पाऊस सुरू झाला की जलमय होतो. कल्याण डोंबिवली परिसरात ७४ मिलीमीटर पाऊस पडला असताना शिळफाटा रस्ता, दिवा शीळ रस्त्याला महानदीचे रूप आले होते. पावसाचे हेच प्रमाण ३०० हून अधिक मिलीमीटरवर गेले तर शिळफाटा रस्त्यावर सात ते आठ फूट पाणी या भागातील वसाहतींचे पहिले, दुसरे माळे जलमय होतील, असे जाणकार सांगतात.
शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा गटारे नाहीत. या रस्त्याची बांधणी राजकीय ठेकेदारांनी केली आहे. त्यामुळे शिळफाटा रस्ता जमिनीला एक समतल महामार्ग पध्दतीने बांधण्यात आलेला नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या रस्त्याला यापूर्वी असलेल्या मोऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाला की रस्त्यावर पडणारे रस्त्याच्या दुतर्फा तुंबते. त्यात वाहून येणाऱ्या पाण्याची भर पडते.
शिळफाटा रस्तालगतचे पाणी यापूर्वी दिवा, मुंब्रा भागातून नैसर्गिक मार्गांमधून वाहून जात होते. हे सर्व मार्ग दिवा, मुंब्रा भागातील बेकायदा इमारती, चाळी, कचराभूमी यांनी बंद केले आहेत. मुसळधार पावसात दिवा शहर जलमय झाले की ते पाणी शिळफाटा कडून वाहून जाणारे पाणी स्वीकारत नाही. दिव्याचे पाणी खाडी दिशेने जाण्यास बेकायदा बांधकामांमुळे सरकण्यास वाव नाही. मलंगगड खोऱ्यातून आलेले पावसाचे पाणी शिळफाटा, या भागातील गृहसंकुले, नेवाळी, आडिवली ढोकळी भागात अडून राहत असल्याने तिसगाव मलंगगड रस्ता, शिळफाटा, दिवा रस्ता आणि परिसरातील गृहसंकुले दरवर्षी जलमय होत आहेत.