ठाणे : नवी मुंबई येथे शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्या समोरच एका व्यक्तीला मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाच्या खारघर येथील शहर प्रमुखाच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर ही घटना घडली. हा सर्व प्रकार घडत असताना पोलीस अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नवी मुंबईतील खारघर भागातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ चंद्रकांत भोसले यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर प्रसारित केला आहे. भोसले यांनी दावा केला होता की, त्यांचे कार्यालय फोडण्यात आले. त्यामुळे तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी, चंद्रकांत भोसले हे शिंदे गटाच्या खारघर येथील शहर प्रमुखाच्या कार्यायलयात गेले होते. त्यावेळी चंद्रकांत यांना बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे त्यांनी चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. पोलीस मला आतमध्ये घेत नाहीत, आमच्यासोबत प्रकार घडला असतानाही आम्हाला कार्यालयात बोलविले जात नाही असा आरोप त्यांनी चित्रीकरणात केला. तसेच कार्यालयाबाहेरी सीसीटीव्हीची मागणी केली.
चंद्रकांत हे चित्रीकरण करत असताना सर्व कार्यकर्ते कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी चित्रीकरणात चंद्रकांत बोलत होते की, ‘हे बघा.. गुंडगिरी यांची. यांनी त्यांच्या कार्यालयात दिघे साहेब, शिंदे साहेबांचा फोटो लावला आहे. त्याचवेळी त्यातील एक कार्यकर्ता भडकला. तो म्हणाला, साहेबांसमोर (पोलीस अधिकारी) मारेल.’ त्यावेळी चंद्रकांत त्यांना गुंडगिरी दाखवा असे म्हणाले. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सुरु असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. पोलिसांसमोर धमकाविले जात असताना आता पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.