डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील मध्यवर्ति शिवसेना शाखेच्या बाजुला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत शिंदे शिवसेनेचे गेल्या दीड महिन्यापासून स्वस्त दरात वह्या, पिशव्या, छत्री विक्री केंद्र सुरू आहे. आता शाळा सुरू होऊन दीड महिना होत आला तरी हे केंद्र मानपाडा रस्त्यावर रस्ता अडवून उभे असल्याने वाहन चालक, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

डोंबिवली पूर्व इंदिरा चौक भागात रिक्षा वाहनतळ आहेत. पलावा, शिळफाटा दिशेने जाणाऱ्या ओमनी वाहने याठिकाणी उभी असतात. शिवसेना मध्यवर्ति शाखेत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची, या भागातील दुकानदारांची वाहने या रस्त्यावर उभी असतात. हा वाहन कोंडीने हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. या वर्दळीमध्ये शिंदे शिवसेनेने शिवसेना शाखेच्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत स्वस्त दरात शालेय साहित्य वाटप केंद्राचा मंच उभा केला आहे. आठ बाय आठ लांबी रूंदीचा मंच वाहतुकीला अडथळा होत आहे हे माहिती असुनही शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तो काढला जात नसल्याने प्रवासी, वाहन चालक नाराजी व्यक्त करत आहेत.

अनेक जागरूक नागरिक, प्रवाशांनी यासंदर्भात पालिकेत तक्रारी केल्या आहेत. परंतु, पालिका कर्मचारी हा मंच काढण्यासाठी आले की वरिष्ठ पदाधिकारी त्यांना रोखत असल्याची चर्चा आहे. या स्वस्त शालेय साहित्य वाटप मंचकाच्या फलकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शहरप्रमुख विवेक खामकर आणि इतरांच्या प्रतिमा आहेत.

आमदार राजेश मोरे नेहमीच कल्याण ग्रामीण भागातील रस्ते, शीळ रस्ता वाहतूक कोंडी मुक्त राहतील यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांमधून त्यांनी घाईघाईने देसाई खाडीजवळील काटई निळजे पुलाचे उद्घाटन केले. प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी आमदार मोरे प्रयत्नशील असताना त्यांना आपण बसत असलेल्या शिवसेना शाखेसमोरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर शिंदे शिवसेनेचा शालेय साहित्य विक्री केंद्राचा मंच अडथळा ठरत आहे हे दिसत नाही का, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी परतणाऱ्या प्रवाशांची इंदिरा चौक, बाजीप्रभू चौकात वर्दळ असते. रेल्वे स्थानक परिसर हा बाजारपेठेचा भाग आहे. त्यामुळे या भागातील फेरीवाले, मंच, हातगाड्या पालिकेच्या फ आणि ग प्रभागाने पूर्णपणे हटविल्या आहेत. परंतु, शिवसेना शाखेवरील मंच हा राजकीय पक्षाचा असल्याने त्याच्यावर कारवाई करताना पालिका कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. शहरहिताचा विचार करणारा एक जागरूक नागरिक दररोज याप्रकरणी पालिकेत तक्रारी करत आहे. या मंचकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे, आमदार मोरे यांच्या प्रतिमा असल्याने या मंचकावर कारवाई करण्याचे धाडस कोणी करत नसल्याचे समजते.