|| जयेश सामंत, नीलेश पानमंद

शिवसेना आणि भाजपची युती झाल्यामुळे राज्यातील काही मतदारसंघांतील लढतींमधील हवा निघून गेली. त्यापैकी ओवळा-माजिवडा हा एक मतदारसंघ म्हणावा लागेल. पाच वर्षांपूर्वी कुणाच्याही गावी नसलेले ठाणे महापालिकेतील अपक्ष नगरसेवक संजय पांडे यांनी भाजपमधून निवडणूक लढवत शिवसेनेचे मातब्बर आमदार प्रताप सरनाईक यांना अक्षरश: घाम फोडला होता. नवे ठाणे म्हणून उल्लेख होत असलेल्या परिसराचा समावेश असलेल्या या मतदारसंघात नवभाजपप्रेमी मतदारांचा भरणा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले होते. त्यामुळे युती होत नाही तर येथे यंदाही चुरशीचा सामना पाहावा लागला असता. युती झाल्यामुळे मात्र सरनाईक यांच्यासाठी ही लढत सोपी झाली असून शिवसेनेचे संघटनात्मक जाळे, सरनाईक यांचा व्यक्तिगत करिश्मा आणि युतीचा पारंपरिक मतदार सरनाईक यांच्या पथ्यावर पडणारा आहे.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ठाणे आणि मीरा-भाईंदर या दोन्ही महापालिकांचा काही परिसर येतो. २००९ पासून या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे निवडून आले आहेत. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार सरनाईक यांना ५२ हजार ३७३ मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार दिलीप देहरकर यांना ३४ हजार १८ मते मिळाली होती. या निवडणुकीत येथे मनसेचे उमेदवार सुधाकर चव्हाण यांना ४३ हजार ३३२ मते मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली आणि हे सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढले. या निवडणुकीत आमदार सरनाईक यांना ६८ हजार ५७१, तर भाजपचे संजय पांडे यांना ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात संजय पांडे हे राजकीय क्षेत्रात फार काही कर्तबगार नाव नाही. सरनाईक यांच्याविरोधात उमेदवार मिळत नसल्याने ऐन वेळेस झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे ठेकेदार असलेले पांडे यांना भाजपने येथून उमेदवारी दिली. प्रचारातही पांडे कुठे दिसले नाहीत. सरनाईक यांचा प्रचार तुलनेने आक्रमक आणि पद्धतशीर होता. त्यामुळे सरनाईक येथून सहज विजयी होतील असेच गणित बांधले जात होते. प्रत्यक्षात मात्र मतमोजणीच्या अखेरच्या फेऱ्यांपर्यंत पांडे यांनी त्यांना कडवी झुंज दिली. वर्तकनगर, लोकमान्यनगर यांसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील मतदार सरनाईक यांच्या मागे उभे राहिल्याने त्यांनी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये विजय मिळवला खरा, मात्र या भागातील भाजपच्या सुप्त मतदारांचे अस्तित्व अगदी ठसठशीतपणे दिसून आले होते. त्यामुळे युतीच्या निर्णयावर येथील लढतीतील चुरस अवलंबून होती.

आघाडी टक्कर देणार का?

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात लोकमान्यनगर, वर्तकनगर, पोखरण रोड, टिकुजिनीवाडी आणि घोडबंदरचा काही परिसर येतो. तसेच मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्राचाही काही परिसर येतो. या दोन्ही महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युतीचे एकूण ४३ नगरसेवक असून या मतदारसंघात सद्य:स्थितीत युतीची ताकद मोठी आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती झाली असल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी कमी झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवार घोषित केलेला नाही. त्यामुळे आघाडीचा उमेदवार कोण असेल हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

मतदारसंघातील समस्या..

  • लोकमान्यनगर भागातील बेकायदा बांधकामांच्या पुनर्विकासाचा प्रश्न
  • घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या
  • वाहनतळाची सुविधा नाही
  • खेळण्यासाठी पुरेशी मैदाने नाहीत

मतदार म्हणतात,

वर्तकनगर भागात आजही अनेक शाळांसमोरील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे शाळा सुटल्यावर या भागात मोठय़ा प्रमाणात कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी येथील आमदार कोणत्याही ठोस उपाययोजना करत नाहीत.  – मधुकर पाटील, स्थानिक रहिवासी

ओवळा-माजिवडा मतदारसंघात अंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. अंतर्गत रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते.  या परिसरात पार्किंगसाठी अधिकृत अशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे आमदारांनी या समस्येचे निराकरण करण्याची गरज आहे.  – अजय दुबे, व्यावसायिक

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली आहेत. घोडबंदर तसेच मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्प, मीरा-भाईंदर नाटय़गृह, घोडबंदर किल्ल्यात डागडुजी, गायमुख चौपाटी, आगरी-कोळी भवन, उपवन सुशोभीकरण, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, अशी अनेक कामे मार्गी लावली. विकासकामांच्या जोरावर मतदार पुन्हा संधी देतील. – प्रताप सरनाईक, आमदार, ओवळा-माजिवडा