डोंबिवली : मागील तीस वर्ष शिंदे शिवसेनेचे डोंंबिवली पश्चिमेतील माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांच्या निष्ठावान शिवसैनिकांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या समर्थकांच्या भाजप प्रवेशा बरोबर उमेशनगर, राजूनगर, महाराष्ट्रनगर, देवीचापाडा भागातील वामन म्हात्रे समर्थक महिला मंडळ, महिला बचत गट, मित्र मंडळांचे गटांचे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या हालचालींमुळे वामन म्हात्रे यांच्या मुलाने भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
वामन म्हात्रे यांचे एके काळचे कट्टर समर्थक राजू सावंत, मनोज वैद्य, संदीप सामंत, अरविंद मानकर यांच्यासह उमेशनगर, महाराष्ट्रनगर, राजू नगर, देवीचापाडा भागातील काही महिला मंडळ, महिला बचत गट आणि इतर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील, आमदार सुलभा गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला.
मागील काही महिन्यांपासून वामन म्हात्रे यांच्या या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. गणेशोत्सवाच्या काळात भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे यांना पालिका निवडणुकीत आपणास योग्य संधी दिली जाईल असे सांगून भाजप प्रवेशासाठी तयार राहण्याचे संकेत दिले होते. भाजपचा एक ज्येष्ठ नेता दारात येऊनही ती मागणी मान्य करण्यास म्हात्रे कुटुंब तयार नसल्याने वामन म्हात्रे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. वामन म्हात्रे यांनी जीवाचे रान करून महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसायटी, देवीचापाडा भागाचा काही पालिका निवडणुकासाठी यापूर्वीच भक्कम करून ठेवले आहेत. मग, या प्रभागात पालिका निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून संधी मिळत असताना, ही संधी म्हात्रे कुटुंब का झिडकारत आहे. ही संधी दवडू नये. भाजप प्रवेशाचा विचार करावा, अशी मागणी काही वेळा बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे यांंना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
चार सदस्य प्रभाग पध्दतीत निवडून यायचे असेल तर आपल्या प्रभागांचा आपण विचार करू. या कार्यकर्त्यांच्या मताचा कोणाताही विचार गेल्या तीन महिन्याच्या काळात करण्यात आला नाही. अखेर येणारे राजकीय वातावरण विचारात घेऊन वामन म्हात्रे यांच्या वैद्य, सामंत, मानकर, सावंत आणि इतर महिला बचत गट, मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय पक्का केला. या कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशासाठी लारा पटेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापासून आपणास रोखू नये म्हणून या चारही कार्यकर्त्यांनी रात्र अज्ञातवासात मोबाईल बंद करून काढली. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता हे कार्यकर्ते डोंबिवली जीमखाना येथे थेट कार्यक्रमस्थळी आले. या निष्ठावान कार्यकर्त्यांची महाराष्ट्रनगर, उमेशनगर, देवीचापाडा, राजूनगर परिसरात पक्षीय ताकद आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत राजकीय वातावरण पालटू शकतात. या कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे वामन म्हात्रे यांच्या मुलाने भाजप प्रवेशासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याची चर्चा आहे.
