एकनाथ शिंदे यांची अर्ज भरण्यापुरती उपस्थिती
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, केळकर यांच्या मिरवणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अनुपस्थिती प्रकर्षांने दिसून आली. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हेही अर्ज दाखल करताना काही काळ उपस्थित होते. तर, शिवसेनेच्या काही पदाधिकारी, नेत्यांनीही थोडा वेळ उपस्थिती दाखवत युतीची रीत पाळली. विशेष म्हणजे, भाजपचे शहर अध्यक्ष आणि उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले संदीप लेले यांचे विलंबाने आगमन भाजपमध्ये पक्षांतर्गत कुरबुरी कायम असल्याचे सांगत होते.
पाच वर्षांपर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत केळकर यांनी या मतदारसंघात विजयी पताका झळकावीत शिवसेनेला धक्का दिला. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही येथे भाजपने मुसंडी मारली. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. ठाणे महापालिका हद्दीत भाजपच्या ताब्यात असलेली ही एकमेव जागा सोडण्याचा प्रश्नच नसल्याने शिवसेनेचा हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर उमेदवारी जाहीर करताना भाजपने येथून विद्यमान आमदार संजय केळकर यांनाच उमेदवारी दिल्याने इच्छुकांच्या यादीत असलेल्यांचा हिरमोड झाला.
हा मतदारसंघ भाजपला सोडल्यामुळे शिवसेनेत मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे. या नाराजीचे प्रतििबब केळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणूक यात्रेवर दिसून आल्याची आता चर्चा रंगली आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे तसेच ढोकाळीतील शिवसेनेचे बडे नेते देवराम भोईर यांचा अपवाद वगळता या रॅलीत पक्षाचा एकही बडा नेता फिरकला नाही. शिवसेनेकडून या मतदारसंघातून रवींद्र फाटक, नरेश म्हस्के हे नेते इच्छुक होते. यापैकी फाटक यांची भेट घेऊन केळकर यांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या खऱ्या; मात्र म्हस्के यांनी केळकर यांच्यासोबत येणे टाळले.
सकाळी ११च्या सुमारास घंटाळी मंदिर येथून सुरू झालेल्या या मिरवणुकीत भाजप कार्यकर्त्यांचीच गर्दी होती. सुरुवातीला शिवसेनेचा मोठा नेताही मिरवणुकीत दिसला नाही. काही काळाने शिवसेनेचे खासदार राजन विचारे, नगरसेवक देवराम भोईर, आरपीआयचे रामभाऊ तायडे हे केवळ २० ते २५ मिनिटांच्या कालावधीसाठी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात केळकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्यानंतर त्या ठिकाणी भाजप नेते गणेश नाईक, संजीव नाईक, निरंजन डावखरे, अनंत तरे, महापौर मिनाक्षी शिंदे आदी उपस्थित झाले. दरम्यान, काही काळाने संदीप लेलेही उशिराने त्या ठिकाणी हजर झाले. केळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उशिराने पालकमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी आले.
संजय केळकर यांना ठाणे शहरातील शिवसेनेकडून पूर्णपणे सहकार्य राहील. शहरातील संपूर्ण शिवसेना ही संजय केळकर यांना ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आणेल. महायुतीचा संजय केळकर यांना पूर्णपणे पाठिंबा आहे.- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा
–
अंगावर पित्त उठत असल्यामुळे उन्हात फिरता येणे शक्य नसल्याने आमदार केळकर यांच्या मिरवणुकीत सहभागी झालो नाही. त्यामुळे थेट अर्ज भरण्याच्या ठिकाणी सहभागी झालो. – संदीप लेले, भाजप ठाणे शहराध्यक्ष