|| जयेश सामंत, नीलेश पानमंद

ठाणे महापालिका क्षेत्रातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ ओळखला जातो. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दोन वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेची मजबूत फळी असली तरी समस्यांची भली मोठी रांग या ठिकाणी दिसून येते. शहरातील सर्वाधिक बेकायदा बांधकामे येथे आहेत. ती दूर करण्यासाठी समूह विकास योजनेची आखणीही झाली आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी कितपत होऊ शकेल याविषयी नियोजनकर्त्यांनाच शंका आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात विरोधकांचे आव्हान नसले तरी समस्यांचे आव्हान मात्र कायम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविण्यात एकनाथ शिंदे गेल्या काही वर्षांत यशस्वी ठरले आहेत. मातोश्री व मुख्यमंत्र्यांमधील दुवा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले गेले.  तरी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करण्यात ते कितपत यशस्वी झाले याविषयी अनेकांच्या मनात पुरेशी स्पष्टता नाही. कोपरी पूर्व भागात तर समस्यांची अक्षरश बजबजपुरी आहे. येथे रेल्वे स्थानकातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी सॅटिसचा प्रकल्प महापालिकेने शिंदे यांच्या आग्रहास्तव आखला असून याच भागातील आनंदनगर झोपडपट्टीचा पुनर्विकास केला जाणार आहे. किसननगर आदी भागात समूह विकास योजनेचा नारळ वाढवला जाईल, अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली आहे. विकासाचे हे प्रकल्प या मतदारसंघात येऊ घातले असले तरी पाच वर्षांत या आघाडीवर साधी वीटही रचली गेलेली नाही.

समस्या

  • बेकायदा बांधकामांच्या पुनर्वसनाचा प्रश्न
  • अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी
  • काही भागांमध्ये पावसाळ्यात होणारा दूषित पाण्याचा पुरवठा
  • वाहनतळ, मैदान आणि उद्यानांची वाणवा
  • आघाडी, मनसे आव्हान देणार का?

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. काँग्रेसचे पदाधिकारी महेश पाटील आणि विनर बिंद्रा या दोघांची नावे चर्चेत असून त्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. तसेच मनसेने बुधवारी रात्री दुसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये कोपरी-पाचपाखाडीतून महेश कदम यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसेच्या मतांची घसरण झाली आहे. असे असले तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांच्यापुढे आघाडी आणि मनसेचा उमेदवार कसे आव्हान उभे करतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

राजकीय आव्हान नाहीच

गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या मतांची घसरण झाली असून या मतदारसंघावर शिवसेनेचा वरचष्मा आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकनाथ शिंदे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच मनसेने महेश कदम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात कोपरी आणि वागळे इस्टेटचा परिसर येतो. ठाणे महापालिका क्षेत्रात पूर्वी एकच ठाणे शहर हा मतदारसंघ होता. २००४ च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे ठाणे शहर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र २००९ मध्ये मतदारसंघाच्या रचनेत झालेल्या बदलानंतर ठाण्यात चार विधानसभा मतदारसंघ झाले. त्यापैकी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे दोनदा विजयी झाले असून या मतदारसंघातून महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आले आहेत. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना ७३ हजार ५०२, काँग्रेसचे मनोज शिंदे यांना ४० हजार ७२६ आणि मनसेचे राजन गावंड यांना ३५ हजार ९१४ इतकी मते मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना १ लाख ३१६, भाजपचे संदीप लेले यांना ४८ हजार ४४७, काँग्रेसचे मनोज गोस्वामी यांना १७ हजार ८७३ आणि मनसेच्या सेजल कदम यांना ८ हजार ५७८ मते मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती नसतानाही शिंदे ५१ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते.

मतदार म्हणतात,

या भागात पाणीपुरवठय़ाची समस्या गंभीर आहे. शहराला पाणीपुरवठा कमी होतो. यासाठी स्वतंत्र धरण बांधण्यात येईल, असे अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे. मात्र, या धरणाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे शहराला पाणीपुरवठा कमी होत आहे. – मिलिंद गायकवाड, अभियंता

मतदारसंघातील पाण्याची समस्या गंभीर आहे. काही भागांत दूषित पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर नितीन कंपनी ते लोकमान्यनगर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाही.  – अमित मोरे, शिक्षक