बदलापूरः विकासाचे राजकारण केले पाहिजे. कोण कुणाला किती शिव्या देते, टीका करते ते महत्वाच नाही. पण कोण काम करत हे जनता पाहते. टीकेला उत्तर देण्यात माणूस गुंतून जातो. त्यामुळे कामावर लक्ष देण्याची गरज आहे, अशा सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बदलापुरात केल्या. कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या काही दिवसात महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. त्यावर खासदार शिंदे यांनी यावेळी भूमिका मांडली.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी बुधवारी बदलापूर पश्चिमेतील गौरी सभागृहात शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात महायुतीत दुफळी माजली असून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिवसेनेच्या विरोधात उभा ठाकला आहे. महायुतीची शक्यता संपुष्टात आली असल्याचे चित्र असताना खासदार शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुऱख वामन म्हात्रे यांच्या मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे काय बोलतात याकडेही लक्ष होते. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीकेला कामातून उत्तर द्या. टीका करण्यात वेळ घालवू नका, अशा सूचना शिवसैनिकांना दिल्या.
आपण लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढलो. सर्वच निवडणुका महायुतीत लढण्याची गरज आहे. एकमेकांशी बोलून युती केली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे असे सांगत शिंदे यांनी महायुतीसाठी आपण तयार असल्याचा संदेश दिला. मात्र या काळात महायुतीत संबंध चांगले राहिले पाहिजेत. महायुतीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे असेही शिंदे पुढे म्हणाले. महायुतीत एकमेकांना आव्हान देण्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याकडे महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले. पण टाळी एका हाताने वाजत नाही, त्यामुळे वरिष्ठांचे निर्णय, स्थानिकांचे म्हणणे ऐकूनच युतीचा निर्णय घेतला जाईल, असेही पुढे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
भाजप नगरसेवक शिंदेसेनेत
एकीकडे श्रीकांत शिंदे यांनी महायुतीसाठी आग्रही राहा असा संदेश दिला. त्याचवेळी भाजपचे माजी नगरसेवक अविनाश भोपी यांना शिवसेनेत त्यांच्याच हस्ते प्रवेश देण्यात आला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. यावेळी बोलताना अविनाश भोपी यांनी सध्याच्या भाजपात जुनी राष्ट्रवादीच राहिली आहे, असे सांगत टीका केली. याप्रसंगी शिवसेनेचे सर्व संभाव्य उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
