वसंत विहार येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या बीएसयूपी योजनेतील सदनिकांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या आठ जणांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कलगुडे याचाही सामावेश आहे. या प्रकारामुळे बीएसयूपीच्या घरांमधील बेकायदेशीर वास्तव्य पुन्हा एकदा उघड झाले आहे.

ठाणे महापालिकेने तुळशीधाम येथील धर्मवीर नगर परिसरात २०१० मध्ये बीएसयूपी योजनेअंतर्गत इमारती बांधल्या आहेत. या इमारतींमधील काही सदनिकांचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे या सदनिकांना ठाणे महापालिकेने कुलूपबंद ठेवले होते. असे असतानाही या सदनिकांमध्ये काहीजण बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते. यासंदर्भातील तक्रारी ठाणे महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर २०२१ मध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली असता, तिथे काही कुटुंब बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे आढळून आले होते.

महापालितकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पंचनामा केला. तसेच कागदपत्रे सादर केली. त्यानुसार शुक्रवारी याप्रकरणी महापालिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कलगुडे याचाही सामावेश आहे.