ठाणे – अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे येथे नियोजित असलेला जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचा शिवसेना पक्षप्रवेश रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे निलेश सांबरे यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत होणारा प्रवेश आता लांबणीवर गेला आहे.
निलेश सांबरे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी यांचे राजकीय वर्तुळात चांगले वजन आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संघटनेचे उमेदवार आणि त्यांनी स्वत: मोठा प्रभाव पाडला. निलेश सांबरे स्वतः भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भिवंडी तालुका आणि शहापूर तालुक्यात लक्षणीय मते घेतली. त्यांना एकूण २ लाख ३१ हजार मते मिळाली.
कुणबी समाजाच्या मतांना आपल्याकडे वळवण्यात सांबरे यशस्वी झाल्याचे बोलले जाते. या मतांमुळे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. धक्कादायक म्हणजे सांबरे पराभूत झाले असले तरी शहापूर विधानसभा मतदारसंघात त्यांना सर्वाधिक मते मिळाली होती. तर मुरबाड आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात त्यांना लक्षणीय मते मिळाली. कपिल पाटील यांचा ६६ हजार मतांनी पराभव झाला होता.
सांबरे यांचे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याशी असलेले संबंधही सर्वश्रुत आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात भाजप उमेदवार किसन कथोरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे एका ठिकाणी भाजपचेच उमेदवार कपिल पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले सांबरे विधानसभेला मात्र किसन कथोरे यांना पाठिंबा देत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजकीय क्षेत्रात अशा मोठ्या दबाव गटाचे नेतृत्व करणारे नीलेश सांबरे अखेर राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात आज प्रवेश करणार होते. वागळे इस्टेट येथील कियारा बँक्वेट सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता.
परंतू, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे निलेश सांबरे यांचा शिवसेना (शिंदे गट) होणारा प्रवेश आता लांबणीवर गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवाद विरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर पाठविलेल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यांच्या अनुभवांवर आधारित मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन आज डोंबिलीत करण्यात आले होते. परंतू, अहमदाबाद येथील विमान अपघातामुळे हा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.