ठाणे : घोडबंदर मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून यामुळे संतप्त झालेल्या घोडबंदरवासीयांकडून सातत्याने आंदोलने करण्यात येत आहेत. त्यातच या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचे काम सुरू असून यामुळे अपघातांची भीती व्यक्त करत हे काम थांबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार संजय केळकर यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नागरिकांनी या प्रकल्पाबाबत आक्रोश व्यक्त केला. त्यापाठोपाठ आता शिवसेना (उबाठा) नेते राजन विचारे यांनी आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सेवा रस्ता विलीनीकरण काम तत्काळ थांबवा, नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जा असा इशारा दिला आहे.
राजन विचारे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून घोडबंदरची वाहतूक कोंडी आणि सेवा रस्ता विलीनीकरण याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. या पत्रामध्ये ठाणे शहराचे घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे या परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे राहणारे नागरिक नोकरीनिमित्त आपली खाजगी वाहने घेऊन घराबाहेर पडत असतात. ठाणे शहरात जड अवजड वाहने सकाळी ७ ते १० या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा वाहतूक शाखेकडून निव्वळ धूळफेक केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. त्यामुळे या वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले असून दररोज घोडबंदर पट्ट्यातील नागरिक तसेच खाजगी संस्था रस्त्यावर उतरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे विचारे यांनी म्हटले आहे.
प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही
खड्यामुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी संदर्भात नागरीक आंदोलन करत असून याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी घोडबंदर महामार्गावरील दोन्ही बाजूस सेवा रस्ता (सर्विस रोड ) विकसित केले होते. ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू होती, त्यामध्ये चार ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द असल्याने त्या ठिकाणी सेवा रस्ता महापालिकेला करता आला नाही.
शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल यांना धोका
घोडबंदरचा मुख्य आणि सेवा रस्ता विलीनीकरणाचा घाट ठाण्यातील काही मंडळी करत आहेत. जर असे विलीनीकरण झाल्यास या रस्त्याच्या दोन्ही बाजूस ८ लाखाच्या वर लोकसंख्या असणाऱ्या वस्तीत सोसायटी, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, चर्च, मंदिरे, बाजारपेठ, यांना धोका निर्माण होणार आहे. पर्यायी रस्ता नसल्याने भविष्यात महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास किवा आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका कशी जाणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आश्वासनांचे काय झाले?
सद्यस्थिती या सेवा रस्ता विलीन करण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी नरेश मनेरा यांनी हि बाब निदर्शनास आणून दिले. यानंतरही नागरिकांना विश्वासात न घेता काम कसे सुरु झाले याचा जाब विचारण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त यांच्याकडे गेलो असताना, एम एम आर डी ए आणि स्थानिक नागरिक यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते परंतु हे आश्वासन खोटे ठरले असून अद्याप बैठक घेण्यात आली नाही, असा आरोप विचारे यांनी केला आहे.