कल्याण – भाजप प्रदेशाध्यांपासून ते स्थानिक जिल्हाध्यक्षांनी कल्याण डोंबिवली पालिकेवर महायुतीचा, त्यात भाजपचा महापौर बसेल अशी वातावरण निर्मिती सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजपने विविध पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी ‘आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल. कोणी काही सांगितले म्हणून महापौर बसत नाही. तर जनतेच्या मनात महापौरांचे स्थान असते. आणि ही जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेते, असे गुगली टाकणारे वक्तव्य खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी कल्याण पूर्वेतील भीम महोत्सवानंतर माध्यमांशी बोलताना केले.

आपल्या संपूर्ण वक्तव्यात खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कोठेही भाजपचा उल्लेख केला नाही. ठाणे, कल्याण-डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसेल यादृष्टीने भाजपने स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपल्या शहरांमध्ये सुप्तपणे प्रचार कार्याला सुरूवात केली आहे. कल्याण डोंंबिवली ही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांंची गावे. ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी पालिकेवर भाजपचा महापौर बसविण्यासाठी डेरा टाकला आहे. या सर्व परिस्थितीत नेहमीच आक्रमक राजकीय विधाने करण्यात पटाईत असणाऱ्या खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी कल्याणमध्ये अतिशय संयमित भूमिका घेऊन राजकीय विधान केले.

कल्याण डोंबिवली पालिकेवर कोणाचा महापौर बसेल, या पत्रकारांच्या प्रश्नावर खासदार शिंदे यांनी आपण महायुतीचे कार्यकर्ते आहोत. महायुतीचा उमेदवार महापौर पदावर बसेल. कोणी काही म्हणाले, आमचे महेश गायकवाड, नीलेश शिंदे म्हणाले म्हणून महापौर होत नसतो. तर जनतेच्या मनात महापौराचे स्थान असते. जनता ठरवील तो महापौर होत असतो. त्यामुळे तुम्ही काहीही म्हणा, ये पब्लिक है, यह सब जानती है’ असे विधान करून खासदारांनी भाजपचाच महापौर होईल या मोहिमेला चिमटा घेतला.

समस्या कोणतीही असो ती सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर तो विषय मार्गी लागतो. लोक समाधानी होतात. पण हीच समस्या सोडविताना त्यामध्ये राजकारण आणले तर मात्र समस्या तशीच कायम राहते. त्या समस्येचे राजकारण होते. त्यामुळे प्रश्न, विषय कोणताही असो समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, इच्छाशक्ती प्रबळ ठेवली तर हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारचा पाठिंबा मिळतो. समस्येचे निराकरण झाले म्हणून लोक समाधानी होतात.

कल्याण पूर्वेत लोकांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याच यावा असे वाटत होते. त्या ठिकाणी आता डाॅ. बाबासाहेबांचे स्मारक उभे राहिले आहे. ही प्रयत्नातून उभी राहिलेली प्राप्ती आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण येता कामा नये, असे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. आपण हे कोणालाही उद्देशून बोललेलो नाही असेही त्यांनी स्पष्ट करून टाकले.