ठाणे : भारतामध्ये नेपाळसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, कारण आपल्याकडे गांधीजी आणि आंबेडकरांची विचारधारा आहे. भारतात कोणतेही बदल झाले तर ते संविधानिक पद्धतीनेच होतील, असे मत अभिनेत्री आणि लेखिका चिन्मयी सुमित यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद या संस्थेच्यावतीने महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे संमेलन चार सत्रांमध्ये ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. यातील चौथ्या सत्रात टॉक शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लेखिका चिन्मयी सुमित बोलत होत्या. या कार्यक्रमात लेखिका इंदुमती जोंधळे आणि पत्रकार राही भिडे या देखील सहभागी झाल्या होत्या.

चिन्मयी सुमित म्हणाल्या, आपण स्वातंत्र्य आणि भाषा या दोन्ही गोष्टी गृहीत धरून चालत आहोत. आपल्या भाषेवर कितीही परकीय आक्रमणे झाली तरी ती टिकली आहे. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे त्यामुळे ही भाषा टिकणारच. मात्र, पालकांना वाटते की मराठी शाळेत मुलांना पाठवले तर मुले स्मार्ट होणार नाहीत.

मी माझ्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातले, यासाठी माझा सत्कार होतो, हे दुर्दैव आहे. मातृभाषेतूनच मन, भावना आणि विचार व्यक्त करता येतात, पण आपल्या भाषेवर विश्वास उरलेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अभिनेत्री असल्याने काही गोष्टीत कुचंबना होत असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, एखाद्या गोष्टीत मी आवाज उठवत असेल तर मला बोलल जात. मी नागरिक म्हणून काही बोलायचे की नाही. मी दरवेळी अभिनेत्री म्हणूच बोलायचे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

लेखिका इंदुमती जोंधळे यांनी मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांत अभिव्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र राहिलेली नाही. समाजात सकारात्मक बदल व्हावा, पिढी घडावी यासाठी कोणी लेखन किंवा भाषण केले तर त्यावर बंधने आणली जातात. वास्तव सर्वांना माहित असूनही आपण आभासी जगात नाटक करून जगतो आहोत, हे मोठे दुर्दैव आहे. ही परिस्थिती बदललीच पाहिजे असे त्या म्हणाल्या.

यावेळी पत्रकार राही भिडे यांनी पत्रकारितेतील बदल अधोरेखित केले. आज वर्तमानपत्रात हिंसाचार आणि गैरवर्तनाच्या बातम्या इतक्या वाढल्या आहेत की पेपर वाचावासा वाटत नाही. पत्रकारितेत पूर्णपणे अभिव्यक्त होण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्यच नाही. जागतिकीकरणानंतर अनेक बंधने आलेली आहेत. पूर्वी जशी पत्रकारिता करता यायची, तशी आता शक्यच नाही, हे मनाला टोचत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.