कल्याण – कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तश्रृंंगी या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पृष्ठभागाचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला. तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या माळ्यावरील स्लॅब पाठोपाठ कोसळत गेले. यात सहा जणांचा मृत्यू झाला. एका बालकाचा यामध्ये समावेश आहे. चार जखमींवर पालिका आणि खासगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.
या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. चिकणीपाडा येथील श्री सप्तश्रृंगी इमारतीचे बांधकाम सन २००६ मध्ये करण्यात आले आहे. ही इमारत चार मजल्याची आहे. एका माजी नगरसेविकेच्या सहकार्याने विकासकाने ही इमारत बांधली आहे. ही इमारत गेल्या वर्षी पालिकेच्या जे प्रभागाने धोकादायक घोषित केली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एका कुटुंबीयांकडून घरातील देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. अचानक या घरातील पृष्ठभागाचा स्लॅब कोसळून तो तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या माळ्यावर कोसळत गेला. एकमेकांच्या भाराने हे स्लॅब कोसळले.
स्लॅबचा जोराचा फटका बसून आणि स्लॅब खाली अडकून एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. स्लॅब कोसळल्यानंतर जोराने आवाज होत गेला. ही घटना पाहून कुटुंबीयांमधील सदस्यांनी बचावासाठी आरडाओरडा सुरू केला. इमारतीमधील इतर सदस्य आणि आजुबाजुचे रहिवासी बचावासाठी धाऊन आले. घरांमध्ये स्लॅब कोसळल्याने या घरांमध्ये प्रवेश कसा करायचा असा प्रश्न बचावासाठी धावलेल्या नागरिकांना पडला. ही माहिती तात्काळ पालिका अग्निशमन दलाला देण्यात आली.
पालिकेचे जे प्रभागाचे आपत्कालीन पथक, पालिका अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी तात्काळ जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. स्लॅबखाली रहिवासी अडकल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी ठाणे जिल्हा आपत्कालीन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्याचा निर्णय घेतला. तिन्ही दलाच्या पथकांनी युध्दपातळीवर बचाव कार्य सुरू केले. या इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. इमारतीमधील कोसळलेला भाग बाहेर काढण्याचे आणि बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही इमारत रहिवासमुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
कल्याण डोंबिवलीत बेकायदा इमारती उभारताना भूमाफियांकडून सिमेंट ऐवजी ग्रीट (खडकाची भुकटी) वापरले जाते. त्यामुळे या इमारती पंधरा वर्षात गळक्या होऊन धोकादायक होत असल्याचे बांधकाम क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले. कल्याण, डोंबिवलीतील वाढत्या बेकायदा इमारती विचारात घेता, हे प्रकार येत्या काळात वाढतील, अशी भीती या तज्ज्ञाने व्यक्त केली. पालिकेचा तत्पर आपत्कालीन विभागाकडून मृत आणि जखमींची माहिती देणे आवश्यक असताना या विभागाने अशी माहिती देणे टाळले. कोळसेवाडी पोलिसांनी ही माहिती अखेर जाहीर केली.
मृतांची नावे
नमस्वी श्रीकांत शेलार (वय २), प्रमिला कालचरण साहू (५६), सुनिता निलांचल साहू (३८), सुशीला नारायण गुजर (७८), व्यंकट भीमा चव्हाण (४२), सुजाता मनोज वाडी (३८).
जखमींची नावे
विनायक मनोज पाधी (४), शर्विल श्रीकांत शेलार (४), निखील चंद्रशेखर खरात (२६), अरूणा वीर नारायण.