ठाणे : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रावतपूर परिसरातल्या बारावफात (ईद-ए-मिलाद-उन-नबी) मिरवणुकीदरम्यान सुरू झालेल्या ‘I Love Mohammad’ या वादाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात देखील याप्रकरणावरुन मुस्लीमबांधव शुक्रवारी रस्त्यावर उतरलेले दिसून आले. परंतु, हे आंदोलन काही वेगळे ठरले कारण, देशात सध्या धार्मिक विषमता पसरविण्याचे प्रयत्न होत असतानाच मुंब्र्यातील मुस्लिम बांधवांनी सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी, या उद्देशाने “आय लव्ह मोहम्मद” आणि “आय लव्ह महादेव” असे नारे देत हिंदु मुस्लीम द्वेष नको, प्रेम हवे, असा संदेश दिला. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा चांगलीच रंगली.
उत्तरप्रदेश येथे निघालेल्या एका मिरवणुकीच्या मार्गावर काही लोकांनी ‘आय लव्ह मोहम्मद’ असा बॅनर लावल्याचा आरोप आहे. या कृतीला हिंदू संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यांच्या मते हा एक नवा पायंडा आहे आणि जाणूनबुजून भावना भडकावण्याचा प्रयत्न यामागे आहे. या आक्षेपानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याचं सांगितलं जाते आहे. तसेच काही मुस्लिम बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या निषेधार्थ उत्तराखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुस्लिम समाजातील सदस्य तीव्र आंदोलन करत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात बहुतांश वस्ती मुस्लिम समाजाची आहे. त्यामुळे या शहरात देखील या प्रकरणाचे पडसाद उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मुंब्रा हे उपनगर सामाजिक एकोपा जोपासणारे शहर आहे, हा संदेश देण्यासाठी आरिफ सय्यद, बासित शेख आणि यश चौधरी या तिघांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन समोरील जामा मशिद येथे निदर्शने केली.
शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर हजारो तरूण रस्त्यावर एकवटले. कोणताही राजकीय पक्ष, संघटनांना सहभागी न करता केवळ १८ ते २५ वयोगटातील तरूणांनी हातात, आय लव्ह मोहम्मद अन् आय लव्ह महादेव असा संदेश लिहिलेले पोस्टर्स हातात धरून निदर्शने केली. याप्रसंगी संघर्ष नको, प्रेम हवे; शांततेसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील; भेदाभेद नको, समता हवीय अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. परंतु, या आंदोलनता तरुणांसह लहान मुले देखील मोठ्यासंख्येने दिसून आली.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आरिफ सय्यद म्हणाले की, हा देश सर्व जातीधर्मांचा आहे. मात्र, धर्माच्या नावावर लोकांची माथी भडकावली जात आहेत. तरूणांना शांतता हवी आहे. द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही या आंदोलनातून धडा दिला आहे. द्वेषाच्या दलदलीत आम्ही प्रेमाची फुले उगवणार आहोत, असे सांगितले.
तर, बासित शेख यांनी, आमचा लढा प्रेमासाठी आहे. दोन धर्मातील तेढ संपविण्यासाठी आज मोठ्या संख्येने तरुणाई एकवटली आहे. हाच संदेश द्वेष मिटवण्यासाठी पूरक आहे, असे सांगितले. तर यश चौधरी या तरूणाने सांगितले की, मुंब्रा हे असे शहर आहे की जिथे हिंदू, मुस्लीम, बौद्ध आणि इतर धर्मीय एकोप्याने रहात असतात. गणेशोत्सव- नवरात्रोत्सवात मुस्लीम बांधव आमच्या घरी येतात तर ईदला आम्ही त्यांच्या घरी जातो. सामाजिक एकात्मता जोपासणाऱ्या शहराची ओळख सबंध देशाला करून देण्यासाठी आम्ही आय लव्ह मोहम्मद अन् आय लव्ह महादेवचा नारा देत आहोत, असे सांगितले.