लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील पूर्व भागातील गोग्रासवाडी मधील संत नामदेव पथ या वर्दळीच्या रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटचे काम ‘एमएमआरडीए’च्या ठेकेदाराकडून अतिशय संथगतीने सुरू आहे. या रस्ते कामामुळे नागरिक, वाहन चालकांना वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागते. यामध्ये शाळकरी मुलांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

‘एमएमआरडीए’कडून डोंबिवलीत काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांवर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही अधिकार पालिकेच्या बांधकाम विभागाला नाहीत. ‘एमएमआरडीए’चे अधिकारी, ठेकेदार पालिकेच्या अभियंत्यांच्या सुचनांचे पालन न करता रस्ते बांधणी करत आहेत. या समन्वयाच्या अभावाचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसत आहे.

गोग्रासवाडीतील संथगती रस्ते कामाच्या तक्रारी नागरिक पालिकेत करतात. या कामावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. तेथील अधिकारी, ठेकेदार आम्हाला जुमानत नाहीत, अशी खंत पालिका अभियंते व्यक्त करतात. स्थानिक अधिकारी म्हणून पालिका अभियंते काँक्रीट ठेकेदाराला सूचना करण्यास जातात, तेथे तो ठेकेदार ऐकत नाही, अशी खंत पालिका अधिकाऱ्यांची आहे.

आणखी वाचा-बनावट वाहन क्रमांक वापरुन फिरणाऱ्या वसईतील चालकाला कल्याणमध्ये अटक

डोंबिवली शहराच्या विविध भागातून येणारा नागरिक गोग्रासवाडी रस्त्याने एमआयडीसी, पाथर्ली, शेलार नाका, घरडा सर्कल, अभिनव शाळा परिसरात जातो. मानपाडा रस्त्याने येणारा वाहन चालक याच रस्त्याने इच्छित स्थळी जातो. गोग्रासवाडी रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांबरोबर वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो.

या रस्त्यावरुन शाळेच्या बस येत नसल्याने पालकांना शाळेने सूचना केलेल्या दूरवरच्या बस थांब्यावर जाऊन थांबावे लागते. ज्येष्ठ, वृध्द यांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे. रस्ते भागातील व्यापारी या संथगती कामामुळे हैराण आहेत. या घाणीतून कोणीही ग्राहक खरेदीसाठी येत नाही, अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या.

आणखी वाचा-डोंबिवलीत महावितरणकडून बेकायदा इमारतींना वीज पुरवठा, महावितरणच्या मुख्य अभियंत्याकडे तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संथगती कामाबद्दल ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ, मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घरत यांनी शुक्रवारी ठेकेदाराला घटनास्थळी बोलावून हे काम योग्यरितीने लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. हे काम वेळेत पूर्ण केले नाही तर मग मनसे स्टाईलने हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा इशारा घरत यांनी दिला.