ठाणे: भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन लघु अग्निरोधक वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांमुळे दाटीवाटीच्या ठिकाणी पथकाला पोहचून आग शमविणे शक्य होणार आहे. वाहनांचे लोकार्पण दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. या वाहनांमुळे आता भिवंडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात एकूण आठ वाहने झाली आहेत.

भिवंडी महापालिका क्षेत्रात गोदामे आहेत. तसेच मोठ्याप्रमाणात दाटीवाटीची वस्ती आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. यामुळे शहरात कोंडी होते. शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली तर, त्याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पथकाला लगेच पोहचणे शक्य होत नाही. काहीवेळेस कोंडीत मार्ग काढत जावा लागतो तर काही वेळेस दाटीवाटीच्या वस्तीत वाहन जात नाही. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविताना पथकांची तारांबळ उडते.

हेही वाचा… ठाणे रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद

अनेकदा अग्निशमन दलाला ठाणे महापालिकेच्या पथकावर अवलंबून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिकेने जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर वार्षिक निधीतून दोन लघु अग्निरोधक वाहने खरेदी केली आहेत. या दोन वाहनांची किंमत एकूण ८६ लाख रुपये इतकी आहे. या वाहनांमध्ये ३० मीटर इतकी होज वाहिनीची सोय देण्यात आली आहे. तसेच या वाहनात मिस्ट तंत्रज्ञान बसविण्यात आलेले असून आगीवर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. महापालिकेच्या ताफ्यात सध्या पाच अग्निरोधक वाहने तर एक बचाव वाहन उपलब्ध आहे. आता दोन लघु वाहनांमुळे अग्निशमन दलाच्या ताफ्यातील वाहनांची क्षमता आठ झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रिया

भिवंडी शहरात रासायनिक गोदामे आहेत. त्याठिकाणी आगी लागण्याचे प्रकार घडतात. अग्निशमन दलाला दाटीवाटीच्या ठिकाणी लघु वाहनांद्वारे घटनास्थळी पोहचण्यास मदत होईल. – अजय वैद्य, आयुक्त, भिवंडी महापालिका.