ठाणे : राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आधारित स्मार्ट एसटी बसगाड्यांची सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे. या बसगाड्यांमध्ये मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीसह इतर अत्याधुनिक यंत्रणा असेल. चालकाने मद्य प्राशन करुन बसगाडी चालविण्याचा प्रयत्न केल्यास किंवा चालकाला डुलकी लागली तरीही त्याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता एसटीच्या बसगाड्यांमधून सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये अनेकदा प्रवास करताना बसगाड्यांची आसने सुस्थितीत नसणे, चालक, वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होणे अशा अनेक घटना घडत असतात. काहीवेळा चालकाच्या चुकीमुळे अपघात घडल्याचेही समोर आले होते. तसेच आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षितता निर्माण होत असते. प्रवासी सुरक्षेच्या अनुशंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच स्मार्ट बसगाड्यांची घोषणा केली होती. बुधवारी ठाण्यात या बसगाडीमधील एआय प्रणालीचे सादरीकरण उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बसगाडीचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये चालक साहाय्य प्रणाली आणि देखरेखीसाठी कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे समोरून होणाऱ्या धडकेची सूचना, बसगाडी मार्गिकेवरील वाहिनी बदलण्याची सूचना, चालकाची स्थिती निरीक्षण अशी माहिती चालकाला मिळणार आहे. बसगाडीमध्ये संपूर्ण ३६० अंश फिरणारे कॅमेरे असतील. तर प्रवाशांसाठी आतील भागात दोन कॅमेरे उपलब्ध असतील. बसगाडीमध्ये एकूण किती प्रवासी प्रवास करत आहे. त्याची मोजणी व्हावी यासाठी प्रवासी मोजणी सेन्सर देखील उपलब्ध असेल. जाहिराती आणि विविध माहितींसाठी एलसीडी स्क्रीन यामध्ये असतील. बसगाडीमध्ये सूचना देण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली कार्यरत असेल. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही. अग्नीरोधक यंत्रणा देखील यामध्ये उपलब्ध असेल.