स्वस्त, मस्त आणि चवदार पदार्थ हे आपल्याला नेहमीच आवडतात. त्यातच जर सँडविच, पिझ्झा, बर्गर, फॅ्रन्की, चाट असे तरुणाईचे आवडते आणि झटपट मिळणारे पदार्थ आणि बरोबर पावभाजी, चायनीज, मिसळ असे ऑल टाइम आवडते पदार्थ असतील तर तरुणाईसाठी तो दुग्धशर्करा योग ठरतो. या सर्वपरिचित आणि सर्वाना आवडणाऱ्या पदार्थाची चव चाखायला मिळणारे ‘स्नॅक्स अटॅक’ हे कॉर्नर सध्या ठाण्यात लोकप्रिय झाले आहे. या सगळीकडे मिळणाऱ्या पदार्थाची आणि त्यातील विविध प्रकारांची नावीन्यपूर्ण चव खाद्य रसिकांना चाखता यावी म्हणून महेश अगरवाल यांनी सहा महिन्यांपूर्वी स्नॅक्स अटॅक हा कॉर्नर सुरू केला.
येथे आपल्याला सँडविच, पिझ्झा, फ्रँन्की, बर्गर, हॉट डॉग्स, पावभाजी, तवा राइस, चायनीज, चाट, दाबेली, मिसळ, कुल्फी असा वैविध्यपूर्ण नाश्ता आणि जेवणासाठी ११६ डिशेसची चव चाखायला मिळते. व्हेज सँडविच, टोस्ट सँडविच किंवा ग्रील सँडविच अशा दररोजच्या सँडविचबरोबरच येथे आपल्याला सिमला मिरची, कांदा, चिली गार्लिक सॉस, मेयॉनीज सॉस आणि चीजपासून तयार केलेले चिली मिली सँडविच, जैन लोकांसाठी खास कांदा नसलेले जैन सँडविच, मसाला चीज टोस्ट, ब्रेड बटर, ब्रेड जॅम बटर अशा अनेक सँडविचची चव आपल्याला चाखायला मिळते. सँडविचबरोबरच येथे आपल्याला व्हेज पिझ्झा विथ मोझोरेल्ला चीज, वैशिष्टय़पूर्ण असा मन्चुरिअन आणि मश्रुम पिझ्झा, जैन पिझ्झा त्याचबरोबर व्हेज बर्गर आणि हॉटडॉग मेयॉनीज बर्गर आणि हॉटडॉगही उपलब्ध आहेत.
सँडविच, पिझ्झा, बर्गरबरोबरच महाविद्यालयीन मुलांचं आवडतं खाद्य असणारी फ्रॅन्कीसुद्धा येथे उपलब्ध आहे. ‘स्नॅक्स अटॅक’ येथील फ्रॅन्कीचे वैशिष्टय़ म्हणजे येथील फ्रॅन्कीमधील तिखट-गोड भाजी. चायनीजमधील पनीर चिली फ्रॅन्कीमध्ये टाकून तयार केलेली पनीर चिली फ्रॅन्की, मन्चुरिअन विथ मेयॉनीज फ्रॅन्की, जैन रोल फ्रॅन्की, नुडल्स शेजवान मेयॉनीज, मेयॉनीज फ्रॅन्की, पनीर चीज फ्रॅन्की, नूडल्स फ्रॅन्की, पनीर फ्रॅन्की, शेजवान फ्रॅन्की म्हणजे मुलांसाठी एका वेळेचा नाश्ताच. दाबेलीमध्ये मेयॉनीज टाकून तयार केलेली मेयॉनीज दाबेली, चीज दाबेली, पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटिस, सुखापुरी, मिसळ पाव, दही मिसळ विथ बटर पाव असे विविध प्रकारचे चवदार नाश्त्याचे मेन्यू पाहून तोंडाला पाणी सुटते.
आपल्या खाद्य जीवनातील अविभाज्य भाग बनलेले पावभाजी आणि चायनीजच्या विविध प्रकारांची चवही येथे आपल्याला अनुभवायला मिळते. दररोजची पावभाजी, चीज पावभाजी, जैन पावभाजी याबरोबरच येथे आपल्याला पाणी न वापरता फक्त थोडे तेल आणि बटर वापरून तयार केलेली फ्राय पावभाजी, दिल्लीचे स्पेशल आलू चाट, मसाला पाव विथ चीज, आलू चाट विथ चीज असे आगळेवेगळे पदार्थ चाखायला मिळतात. येथे मिळणारे पनीर पुलाव, तवा राइस, चीज पनीर पुलाव, डाळ खिचडी, डाळभात ,आणि दही भातासारखे पदार्थ म्हणजे एकदम घरगुती जेवणासारखे वाटतात. चायनीजमध्ये मंचाव सूप, मश्रुम सूप, व्हेज क्रिस्पी, फ्लॉवर आणि पनीरचे मिश्रण असलेली पनीर क्रिस्पी, मश्रुम चिली व्हेज कटलेट असे स्टार्टर्स आणि त्याबरोबर फ्राइड राइस, मन्चुरिअन फ्राइड राइस, शेजवान नूडल्स, ट्रिपल शेजवान राइस असे सर्वपरिचित आणि सर्वाना आवडणारे विविध प्रकारचे चायनीज राइस आणि नूडल्सही येथे उपलब्ध आहेत. नाश्ता किंवा जेवण झाल्यावर मस्त थंडगार मसाला ताक, लस्सी आणि त्याच्या जोडीला मलाई, पिस्ता आणि मँगो कुल्फीची चवही येथे आपल्याला चाखायला मिळते.
‘स्नॅक्स अटॅक’चे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारी वैशिटय़पूर्ण अशी पापड चुरी आणि पापडी चाट. प्रथम तव्यावर बटर टाकून त्यात पावभाजी मसाला, तिखट-मीठ आणि रोस्टेड पापडचे मोठे तुकडे टाकून संपूर्ण मिश्रण ढवळून एकसंध करून चवदार पापड चुरी तयार केली जाते. शेवपुरीच्या पुऱ्या, तिखट-गोड चटणी आणि दही यांपासून तयार केली जाणारी पापडी चाट ही प्रथम एका भांडय़ात शेवपुरीच्या पुऱ्या कुस्करून त्यात तिखट आणि गोड चटणी आणि दही टाकून ते मिश्रण एकसंध होईपर्यंत ढवळून तयार केले जाते.
- पत्ता–स्नॅक्स अटॅक, शॉप नं ८, सोहम प्लाझा, बिकानेर स्वीट्सजवळ, घोडबंदर रोड, मानपाडा , ठाणे ( प. )