ठाणे : भारतामध्ये अजूनही लाखो लोक गरिबी आणि मानसिक आजारांच्या छायेत जगत आहेत. अशा वेळी समाजाने अधिक संवेदनशील होऊन मानवतेसाठी कार्य करण्याची गरज आहे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केले. समाजाला एका महान व्यक्तीची नाही, तर अनेक डॉ शुभा थत्ते, डॉ आनंद नाडकर्णी यांची गरज आहे जे निस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करतील असेही त्यांनी सांगितले.
डॉ. शुभा थत्ते लिखित ‘अवघाचि संसार- कडू गोड आठवणींचा कोलाज’या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी ठाण्यातील श्रीमंत बाजीराव पेशवे सभागृहात पार पडला. हा प्रकाशन सोहळा डिंपल पब्लिकेशन प्रकाशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी मॅगसेसे पुरस्कार सन्मानित डॉ. भरत वाटवानी आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, लोकसत्ता दैनिकाच्या ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादक आरती कदम आणि लेखिका डॉ. शुभा थत्ते हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. भरत वाटवानी म्हणाले, भारतामध्ये सुमारे २७ टक्के लोकसंख्या ही गरिबीरेषेखाली जगते. ग्रामीण भागात रोज ३२ रुपयांवर जगणारे अनेक कुटुंब आहेत. तसेच १९ कोटींहून अधिक लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. त्यातील काही तर गंभीर मानसिक विकारांमुळे रस्त्यावर बेघर फिरत राहता. अशा परिस्थितीत समाजाने संवेदनशील होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे समाजाला फक्त एक महान व्यक्ती नको, तर आनंद देणारे हवे आहेत. जे समाजासाठी कार्य करतील. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, गांधी यांच्यात रक्तसंबंध नव्हते, पण त्यांनी मानवतेसाठी काम केले. हीच देण्याची भावना पुढे नेण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
डॉ. नाडकर्णी म्हणाले, माझा मानसिक आरोग्याचा प्रवास डॉ शुभा थत्ते यांच्यासोबत सुरू झाला आणि आजही तो तसाच सुरू आहे. १९८१ मध्ये मानशास्त्र विभागात असताना डॉ. थत्ते यांच्याशी माझी ओळख झाली. त्यावेळी मानसिक आरोग्याविषयी जागृतीचा पहिला कार्यक्रम आम्ही एकत्र केला. त्यातूनच मनोविकास सारखा उपक्रम उभा राहिला, ज्याला आज २५ वर्षे पूर्ण झाली असून महाराष्ट्रात आणि देशभरात त्याचे हजारो कार्यक्रम झाले. तसेच माझी संशोधकाची वृत्ती नाही. मात्र संशोधनाचे योगदान हे थत्ते यांच्या प्रवासात छान आहे. तसेच प्रसन्नतेसाठी तपश्चर्या लागते आणि डॉ. थत्ते यांनी ती आयुष्यभर केली आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात लोकसत्ता दैनिकाच्या ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादक आरती कदम यांनी डॉ शुभा थत्ते यांच्या ‘अवघाचि संसार- कडू गोड आठवणींचा कोलाज’या पुस्तकाविषयी बोलताना सांगितले की, अत्यंत ओघवत्या आणि चित्रदर्शी शैलीत लिहिलेल्या या पुस्तकात मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात डॉ. थत्ते यांनी गेली ३५ वर्ष केलेले मोलाचे काम दिसते. आज समाजाला मानस आरोग्याची सर्वात जास्त गरज आहे. त्यांनी यापुढेही असेच काम करत राहावे. यावेळी डॉ. शुभा थत्ते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ. अनुराधा सोवनी यांनी केले. तर आभार नीता कर्णीक यांनी मानले.
