डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील टंंडन रस्ता भागातील एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तुमचा सरकारी जमिनीवरील सात बारा उतारा तुमच्या सोसायटीच्या नावे करून देतो. या बदल्यात शासन शुल्क वगळून इतर खर्चासाठी सोसायटीतील एकूण १५ सदस्यांच्या माध्यमातून एका मध्यस्थाने (एजंट) सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून मागील तीन वर्षात २८ लाख ९३ हजार रूपये वसूल केले. त्यानंतर सोसायटी चालकांंना बनावट सात बारा उतारा आणि महसूल विभागाची काही कागदपत्रे सादर करून सोसायटी पदाधिकाऱ्यांची एकूण २४ लाख ९३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.

मध्यस्थाने घेतलेल्या एकूण २८ लाख ९३ हजार रूपयांच्या रकमेपैकी मध्यस्थाने सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या तगाद्यानंतर चार लाख रुपये सोसायटीला परत केले. उर्वरित रक्कम अनेक वेळा मागणी करूनही मध्यस्थाने परत न केल्याने मध्यस्थाने आपली फसवणूक केली म्हणून सोसायटी पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

डोंबिवली पूर्वेतील टंडन रस्त्यावरील ओम चिदानंद सोसायटीच्या अध्यक्षा आरती सडेकर यांनी कन्व्हेअन्स डीडचे काम करून देणारा मध्यस्थ वैभव वामन गावाले (रा. कल्याण) यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. वैभव गावाले यांनी यापूर्वी डोंबिवलीतील ओम समर्थ कृपा सोसायटी पदाधिकाऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक केली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल आहे, असे तक्रारदार सडेकर यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

सोसायटी अध्यक्षा सडेकर यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आम्ही राहत असलेली ओम चिदानंद सोसायटी १९९४ मध्ये बांधण्यात आली. ही इमारत सरकारी जमिनीवर उभी आहे. शासन आदेशाप्रमाणे अशा जमिनी भोगवटादार २ मधून भोगवटादार १ म्हणजे सोसायटीच्या नावे होणार आहेत. सरकारी जमिनीचा सोसायटीच्या नावे सातबारा उतारा करण्यासाठी सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने मध्यस्थ म्हणून वैभव गावाले यांंना नियुक्त करण्यात आले. शासन शुल्क वगळून वैभव यांना एकूण १५ लाख रुपये देण्याचे ठरले. वैभव आणि सोसायटी यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला.

सोसायटीतील प्रत्येक सदस्याने सदनिकेच्या चौरस फुटाप्रमाणे पैसे देण्याचे ठरले. अशी एकूण २८ लाख ९३ हजार ७०० रूपयांची रक्कम सोसायटी बँक खात्यात जमा झाली. ही रक्कम कन्व्हेअन्स डीडच्या कामासाठी वैभव गावाले यांना देण्यात आली. हे पैसे स्वीकारताना वैभव यांनी सोसायटीला ओम चिदानंद सोसायटीचा सात बारा उतारा आणि महसूल विभागाची काही कागदपत्रे दिली. ही कागदपत्रे बनावट असल्याचे नंतर सदस्यांचा निदर्शनास आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोसायटी पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात विचारणा केल्यावर त्यांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. तीन धनादेश सोसायटीला दिले. ते बँकेत वटले नाहीत. सततच्या मागणीनंतर चार लाख रुपये परत केले. उर्वरित २४ लाख ९३ हजाराची रक्कम परत करण्यासाठी कोणतीही हालचाल वैभव गावाले यांच्याकडून होत नसल्याने, त्यांनी बनावट सात बारा उतारा देऊन सोसायटी पदाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. रामनगर पोलस याप्रकरणाचा तपास करत आहेत.