ठाणे – गुरूपौर्णिमेनिमित्त इंद्रधनु संस्थेच्यावतीने शास्त्रीय संगीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाण्यातील शास्त्रीय गायन क्षेत्रातील काही निवडक गुरूंच्या शिष्यांनी आपल्या गुरूंसमोर कला सादर करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व प्रेम व्यक्त केले. हा कार्यक्रम ठाण्यातील सहयोग मंदिर येथे पार पडला.
भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरा ही पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे. यात काळाप्रमाणे अनेक बदल होत गेले. ज्ञानार्जनाच्या पद्धती आणि माध्यमांमध्ये बदल झाले. मात्र या सगळ्यामध्ये गुरू आणि शिष्यांतील नाते तसेच असल्याचे दिसून येते. गुरूपौर्णिमेनिमित्त सर्व शिष्य आपल्या गुरूंप्रती आदरभाव व्यक्त करत असतात. गुरूपौर्णिमा आणि कलाकारांना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूनी ठाण्यातील इंद्रधनु संस्थेच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विविध क्षेत्रातील शिष्यांना आपल्या गुरूंसमोर आपली कला सादर करण्यात आली. यंदा शास्त्रीय गायन क्षेत्राची निवड केली असून या क्षेत्रातील निवडक गुरूंच्या शिष्यांनी कला सादर केली. यावेळी कार्यक्रमात पंडित सुरेश बापट यांचे शिष्य अमेय कारुळकर यांनी राग सोहनी आणि सृष्टी कुलकर्णी यांनी राग मिया मल्हार सादर केले. तसेच डॉ वरदा गोडबोले यांच्या शिष्या रचना मुळ्ये फाळके यांनी राग हमीर आणि सोजी मॅथ्यू यांनी राग हंसध्वनी सादर केले.
अपूर्वा गोखले यांच्या शिष्य अमृता कामथ यांनी राग नायकी कानडा आणि प्रियांका भिसे यांनी राग चंद्रकंसचे सादरीकरण केले. त्याचबरोबर कल्याणी साळुंके यांची शिष्या हर्षा भावे यांनी राग यमन कल्याण आणि अभंगाच्या सुरेल सादरीकरणातून गुरूंना वंदन केले. त्यांना तबल्यावर आदित्य पानवलकर व संवादिनीवर हर्षल काटदरे यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांनी केले.
संस्थेने आयोजित केलेले आतापर्यंतचे हे कार्यक्रम ठाणे शहरातील इंद्रधनु संस्था ही दरवर्षी सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबवत असते. यामद्ये सांगितीक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे असे विविध कार्यक्रम होत असतात. या संस्थेच्यावतीने रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता स्मरणातले टाटा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर यंदा वर्षाच्या सुरूवातीलाच स्वरांचा उत्सव, विचारांचा उत्सव या रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर अध्यात्म सरिता या तीन दिवसीय अध्यात्मिक विचारमालेचे आयोजन करण्यात आले होते.